RCB vs GT : आरसीबी चोकर! शुभमन गिल गुजरातसाठीच नाही तर मुंबईसाठी ठरला हिरो, विराटचे शतक गेले वाया| Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RCB vs GT

RCB vs GT : आरसीबी चोकर! शुभमन गिल गुजरातसाठीच नाही तर मुंबईसाठी ठरला हिरो, विराटचे शतक गेले वाया

Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans : विराट कोहलीच्या झंजावाती शतकामुळे आरसीबीने 198 धावांचा डोंगर उभारला मात्र शुभमन गिलच्या 52 चेंडूत ठोकलेल्या 104 धावांच्या शतकी खेळीमुळे गुजरातने हा डोंगर पार केले. मात्र गुजरातच्या या धडाकेबाज विजयाचा आनंदोत्सव हा मुंबईत साजरा केला जाणार आहे. कारण मुंबईने प्ले ऑफचे तिकीट शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे पक्के केले.

शुभमन गिलचा आक्रमक अवतार 

शुभमन गिल आणि विजय शंकर यांना दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची दमदार भागीदारी रचली. विजय शंकर 35 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. त्यावेळी गुजरात 15 व्या षटकात 148 धावांपर्यंत पोहचला होता.

मात्र यानंतर आरसीबीने दसुन शानका आणि डेव्हिड मिलर यांना अनुक्रमे शुन्य आणि सहा धावांवर बाद केले. यामुळे गुजरातसकट मुंबईचाही बीपी वाढला होता. मात्र दुसऱ्या बाजूने धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलने षटकार आणि चौकारांची बरसात केली.

गिल आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र सामनाही बॉल टू रन आला होता. गुजरातला सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूत 8 धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या वेन पार्नेलने पहिला नो बॉल त्यानंतर वाईड बॉल टाकून गुजरात आणि मुंबईची मदतच केली. अखेर फ्री हिटवर शुभमन गिलने षटकार ठोकत आपले शतक, गुजरातचा विजय आणि मुंबईचे प्ले ऑफचे तिकीट फायनल केले.

पॉवर प्लेमध्ये गुजरातला पहिला धक्का

आरसीबीने ठेवलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा पॉवर प्लेमध्ये पहिला धक्का बसला. सलामीवीर वृद्धीमान साहा 12 धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने बाद केला.

मात्र त्यानंतर सलामीवीर शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी आरसीबीच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरूवात केली.

विराटचा आक्रमक अवतार

विराट कोहली आक्रमक फटकेबाजी करत चौकारांची बरसात करत होता. त्याला साथ देण्याासाठी आलेल्या अनुज रावतने 13 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या दरम्यान विराट कोहलीने 13 चौकार 1 षटकार मारत 61 चेंडूत नाबाद 101 धावा चोपल्या. अखेर अनुज आणि विराटने सहाव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचत आरसीबीला 20 षटकात 197 धावांपर्यंत पोहचवले.

आरसीबीचा डाव घसरला

आरसीबीची अवस्था 3 बाद 85 धावा अशी झाल्यानंतर विराटने मायकल ब्रेसवेलसोबत चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. ब्रेसवेलनेही 16 चेंडूत 26 धावा चोपत 47 धावात आपला वाटा उचलला. मात्र ही जोडी शमीने फोडली. पाठोपाठ यश दयालने दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद केले.

अडखळत्या सुरूवातीनंतर आरसीबीने पकडला वेग

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या सामन्यात आरसीबीने पॉवर प्लेच्या पहिल्या काही षटकांमध्ये अडखळती सुरूवात केली. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी धावाची गती वाढवली. त्यांनी 6 षटकात 60 धावा केल्या. मात्र पॉवर प्लेनंतर फाफ ड्युप्लेसिस 28 धावा करून बाद झाला.

सामना झाला सुरू

पावसाच्या लपंडावात अखेर आरसीबीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला सामना सुरू झाला.

पुन्हा पावसाला सुरूवात 

नाणेफेक झाल्या झाल्या पुन्हा एकदा बंगळुरूमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र या पावसाच्या हलक्या सरी आहे. तरी देखील खेळपट्टीवर कव्हर पुन्हा एकदा घालण्यात आले आहे.

सामना होणार पूर्ण षटकांचा

जरी आरसीबी - गुजरात सामन्यापूर्वी तुफान पाऊस पडला, नाणेफेकीस विलंब झाला तरी सामना 8.30 पूर्वी सुरू होणार असल्याने तो पूर्ण 20 - 20 षटकांचा होईल.

हार्दिकने नाणेफेक जिंकली

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

आरसीबी विरूद्ध गुजरात सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने नाणेफेकीस उशीर झाला आहे. मात्र आता पाऊस थांबल्याने थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.