
Ruturaj Gaikwad Wedding: प्री-वेडिंगला फाटा; सिंपल मेहंदी, ऋतुराजच्या लग्नातला साधेपणा महाराष्ट्राला आदर्श
Ruturaj Gaikwad Wedding : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून दणादण खेळी करणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाड. मूळच्या पुण्याच्या असलेल्या ऋतुराजने वेळोवेळी धावा काढून सीएसकेला जेतेपद मिळविण्यासाठी मोठा हातभार लावला. आयपीएलनंतर ऋतुराजची लगीनघाई सुरू आहे. मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ऋतुराजने वाग्दत्त वधूसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून लग्नाच्या जोरदार चर्चा रंगल्या. लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. ऋतुराजची भावी पत्नी उत्कर्षा पवारच्या हातावर ऋतुराजच्या नावाची मेहंदी रंगली आहे. त्यानेही उत्कर्षाच्या नावाची मेहंदी काढली आहे.
'फिलमवाला' या इन्स्टाग्राम पेजद्वारे या दोघांच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले. चर्चेतील व्यक्तीचे लग्न म्हटले की, अवाढव्य खर्च, भरजरी कपडे, दागिने यांवर भरमसाट खर्च केला जातो. मात्र ऋतुराज याला अपवाद आहे. ऋतुराज व उत्कर्षाचे फोटो पाहिले की, त्यांचा साधेपणा लक्षात येतो.
घरगुती पद्धतीने त्यांनी हा मेहंदी कार्यक्रम केला. शिवाय दोघांनीही अगदी साध्या पद्धतीचे कपडे परिधान केले होते. उत्कर्षाने शॉर्ट वेस्टर्न ड्रेस परिधान करण्यास पसंती दिली; तर ऋतुराजने साधा सदरा, पायजमा घातला होता. त्यांच्या साधेपणानेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.