Shubman Gill Orange Cap: शुभमनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली मात्र विराटचं मोठं रेकॉर्ड मोडण्याचं गेलं राहून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill Orange Cap: शुभमनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली मात्र विराटचं मोठं रेकॉर्ड मोडण्याचं गेलं राहून

Shubman Gill Orange Cap: शुभमनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली मात्र विराटचं मोठं रेकॉर्ड मोडण्याचं गेलं राहून

Shubman Gill Orange Cap : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलच्या डोक्यावर आयपीएल 2023ची ऑरेंज कॅप सजली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 20 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यासह त्याने या हंगामात आपल्या धावांची संख्या 890 वर नेली, जी आयपीएलच्या 16 व्या हंगामातील कोणत्याही फलंदाजापेक्षा सर्वाधिक आहे. गिलने 17 सामन्यात या धावा केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक 973 धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी केला होता. मात्र, एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गिल कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिल आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या 23 वर्षे 263 दिवसात त्याने ही कामगिरी केली. गिलने 2021 मध्ये वयाच्या 24 वर्षे 257 दिवसांत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडला आहे.

शुभमन गिलनंतर या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसी आहे. डुप्लेसीने 14 सामन्यात 730 धावा केल्या. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत गिल चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलने या मोसमात 85 चौकार आणि 33 षटकार मारले. या यादीत राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर 128 चौकारांसह पहिल्या तर विराट 122 चौकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नर 119 चौकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यासह आयपीएलच्या एका मोसमात फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. यादरम्यान त्याने विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीने 2016 मध्ये ही कामगिरी केली होती. गिलसाठी गेले 5 महिने चांगले गेले. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 8 शतके झळकावली आहेत.