Virat Kohli SRH vs RCB : मी खूप तणावाखाली होतो आता मात्र बाहेरच्या... कोहलीने सामन्यानंतर दिले सडेतोड उत्तर | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli SRH vs RCB IPL 2023

Virat Kohli SRH vs RCB : मी खूप तणावाखाली होतो आता मात्र बाहेरच्या... कोहलीने सामन्यानंतर दिले सडेतोड उत्तर

Virat Kohli SRH vs RCB : विराट कोहलीने सनराईजर्स हैदराबादविरूद्ध शतकी खेळी करत आरसीबीला करो या मरो सामन्यात विजय मिळवून दिला. हैदराबादने आरसीबीसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. हेन्रिच क्लासेनने 51 चेंडूत 104 धावांची तुफानी खेळी केली होती. त्या प्रत्युत्तरात विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्याने फाफ ड्युप्लेसिससोबत 172 धावांची दमदार सलामी दिली. विराट कोहलीवर त्याच्या स्ट्राईक रेटवरून टीका होत होती. मात्र या टीकाकारांना त्याने बॅटने तसेच सामना झाल्यानंतरही प्रत्युत्तर दिले.

सामना झाल्यावर सामनावीर विराट कोहली म्हणाला, 'उत्कंठावर्धक सामना पाहता ही खेळी खास होती. झुंजार हैदराबादने चांगली धावसंख्या उभारली होती. चेंडू देखील खेळपट्टीवर ग्रिप करत होता. फाफ ड्युप्लेसिस एका वेगळ्याच स्तरावर होता. मला गेले दोन सामने फारसे चांगले गेले नव्हते. मी ज्या प्रकारे नेटमध्ये चेंडू मारत होतो ते सामन्यावेळी माझ्याकडून होत नव्हतं.'

विराटला त्याच्या हैदराबादविरूद्धच्या खराब ट्रॅक रेकॉर्डबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, 'मी आधीच्या रेकॉर्ड्सकडे पाहत नाही. मी आधीच स्वतःला खूप दबावात टाकले होते. मी आता बाहेरून कोणी काही म्हणते याची काळजीच करत नाही. मी फार मोठे फटके मारणारा खेळाडू नाही. आयपीएलनंतर कसोटी खेळायची आहे. मी माझे फलंदाजीचे तंत्र बिघडवू शकत नाही.'

विराटला फाफ ड्युप्लेसिससोबतच्या भागीदाऱ्यांविषयी विचारले असता तो म्हणाला की, मला वाटते हे टॅटूमुळे होत असेल. आमच्या दृष्टीने हे खूप चांगले स्थित्यंतर होते. आम्ही वरच्या फळीत आरसीबीकडून एकत्र खेळतोय आणि आपली छाप सोडतोय.' हैदराबादमध्ये मिळालेल्या चाहत्यांच्या पाठिंब्याविषयी विराटने प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, आजचे चाहते खूप भारी होते. मी फाफला बोललो की, असं वाटतंय की आपण आपल्या घरच्या मैदानावरच खेळतोय. ते आमच्यासाठी चिअर करत होते. माझ्या नावाचा जयघोष सुरू होता. मला असे वाटते की हे तयार करता येत नाही. मी मला समर्थन देण्यासाठी कोणावर सक्ती करू शकत नाही. तुम्ही खूप लोकांना आनंद देऊ शकता या स्थितीत असणं खूप भारी वाटतं.'

(Sports Latest News)