WTC Final 2023: टीम इंडियाला IPL महाग पडणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या 'त्या' निर्णयाने बसला मोठा झटका | Team India | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 wtc final 2023-ind-vs-aus-world-test-championship

WTC Final 2023: टीम इंडियाला IPL महाग पडणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या 'त्या' निर्णयाने बसला मोठा झटका

Ind vs Aus WTC Final 2023 : टीम इंडियाने आता आपले लक्ष आयपीएलमधून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे वळवले आहे. आयपीएलमधून बाहेर गेलेल्या सहा संघांचे खेळाडू मंगळवारी इंग्लंडला रवाना झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या संघाची पहिली तुकडी रवाना झाली असून त्यानंतर दुसरी तुकडी जाणार आहे.

दरम्यान आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 मे रोजी उर्वरित खेळाडू देखील इंग्लंडला रवाना होतील.

मात्र यादरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाला WTC 2023 फायनलसाठी योग्य तयारी करण्याची संधी मिळणार नाही, जे खेळाडूंसाठी चिंतेचे कारण असू शकते.

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे.

याआधी टीम इंडियाने एक सराव सामना खेळणार होती, जेणेकरुन टी-20 मधील खेळाडूंना कसोटीच्या फॉरमॅटशी जुळवून घेता येईल. मात्र आता भारतीय संघ कोणताही सराव सामना खेळू शकणार नसल्याचे कळत आहे.

29 मे रोजी इंग्लंडला रवाना होणारे खेळाडू 30 तारखेपर्यंत तेथे पोहोचतील. 1 ते 7 जून दरम्यान किमान काही दिवस सराव सामने खेळण्यासाठी संघाला पुरेसा वेळ मिळणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी कौंटी संघाविरुद्ध तीन दिवसीय सामना खेळण्याची संधी मिळावी, अशी बीसीसीआयची योजना होती.

इंग्लिश कौंटी स्पर्धेचा मोसम सुरू असल्यामुळे भारताला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी सराव सामना मिळणार नाही. अशा परिस्थितीतही कौंटी संघांनी जरी खेळण्याची तयारी दर्शवली तरी तो संघ दुय्यम श्रेणीचा असेल.

कोणताही कौंटी संघ अव्वल खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळे कमकवुत संघाबरोबर खेळून आवश्यक असलेला सराव आपल्या संघाला मिळणार नाही.

टीम इंडियाचे जवळपास सर्वच खेळाडू गेल्या दोन महिन्यांपासून टी-20 क्रिकेट खेळत आहेत, त्यांना एकाच वेळी कसोटीसाठी तयार करणे सोपे जाणार नाही.

दुसरीकडे जर आपण ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोललो, तर त्यांचे फक्त काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत, बाकीचे खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचून आणि एका किंवा दुसर्‍या काऊंटी संघाबरोबर खेळून त्यांची तयारी अधिक ठोस करत आहेत.

टीम इंडियाचा चेतेश्वर पुजारा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याची आयपीएलमध्ये निवड झाली नाही. त्यानंतर तो थेट कौंटी संघाकडून खेळत आहे आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय सराव सामन्याचे आयोजन करू शकेल की केवळ अंतिम फेरीपर्यंत जाईल हे पाहावे लागेल.

WTC फायनलसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन.