नोवोप्पान, कॅटी डुनचा उपांत्य फेरीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - ः डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित सोळाव्या पंचवीस हजार डॉलर एनईसीसी आयटीएफ महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत इंग्लंडच्या कॅटी डुन व थायलंडच्या नोवोप्पान लेत्चीकारनने प्रतिस्पर्ध्यांना हरवून उपांत्य फेरी गाठली.

पुणे - ः डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित सोळाव्या पंचवीस हजार डॉलर एनईसीसी आयटीएफ महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत इंग्लंडच्या कॅटी डुन व थायलंडच्या नोवोप्पान लेत्चीकारनने प्रतिस्पर्ध्यांना हरवून उपांत्य फेरी गाठली.

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविलेल्या भारताच्या करमन कौर थंडीचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या पोलिना मोनोव्हाने करमन कौर थंडीचा 6-3, 7-6(1) असा पराभव केला. 96 मिनिटे चाललेल्या या सामन्यामध्ये पोलिनाने वर्चस्व गाजवले. पहिला सेट पोलिनाने केवळ 39 मिनिटांमध्ये 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये करमनने थोडा प्रतिकार केला; परंतु निर्णायक क्षणी तिच्याकडून टाळता येण्याजोग्या चूका झाल्या व त्याचा फटका तिला बसला टायब्रेकपर्यंत रंगलेल्या या सेटमध्ये पोलिनाने करमनवर विजय मिळवला.

सहाव्या मानांकित व थायलंडच्या नोवोप्पान लेत्चीकारन हिने अग्रमानांकित व स्विर्त्झलंडच्या कोनी पेरीनचा 6-7(1), 6-2, 6-0 असा पराभव करून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला. एक तास 37 मिनिटे चाललेल्या या सामन्यात नोवोप्पानने बेसलाइनवरून कोनीपेक्षा अधिक अचूक खेळ केला. आपल्या ताकदवान फोरहॅंड आणि बॅकहॅंड फटक्‍यांद्वारे नोवोप्पानने कोनीवर वर्चस्व गाजवले. काहीशा वेगळ्या पद्धतीने रॅकेट धरणाऱ्या नोवोप्पानने पहिला सेट टायब्रेकमध्ये गमवल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये कोनीला सामन्यामध्ये परतण्याची संधीपण दिली नाही. हे सेट 6-2 आणि 6-3 असे सहज जिंकून नोवोप्पानने कोनीपेक्षा अधिक सरस खेळ केला.

कॅटी डुन हिने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज तिसऱ्या मानांकित आणि जपानच्या अकिको अमेई हिचा 5-7, 6-3, 7-6(6) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयश्री मिळवली. तब्बल 2 तास 38 मिनिटे चाललेल्या या सामन्यामध्ये पहिला सेट अकीकोने 7-5 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कॅटीने 6-3 असा विजय मिळवून सामना एकतर्फी होणार नाही याची काळजी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये अकिको 5-3 अशी आघाडीवर होती व तिला केवळ एक गेम जिंकण्याची आवश्‍यकता होती; पण कॅटीने अकीको हिची 9 व्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व यानंतर 6-6 अशी गेम बरोबरी केली. टायब्रेकमध्ये कॅटीने 8-6 अशा फरकांनी गुण जिंकत उत्कंठावर्धक विजयाची नोंद केली.
दुसऱ्या मानांकित तामरा झिदानसेक हिने रशियाच्या ऍनास्तासिया प्रिबायलोव्हाचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारताच्या करमन कौर थंडीबरोबरच अंकिता रैनाचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.

Web Title: ITF women's tennis tournament