World Cup 2019 : जेसन रॉय दोन सामन्यांना मुकणार

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

घरच्या प्रेक्षक आणि मैदानावर खेळताना यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला विजयाचा मार्ग गवसला आहे. पण, या मार्गावरून वाटचाल करताना त्यांच्यासमोर खेळाडूंच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : घरच्या प्रेक्षक आणि मैदानावर खेळताना यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला विजयाचा मार्ग गवसला आहे. पण, या मार्गावरून वाटचाल करताना त्यांच्यासमोर खेळाडूंच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

इंग्लंडचा प्रमुख सलामीचा फलंदाज स्नायुच्या दुखापतीमुळे दोन सामन्यात खेळू शकणार नाही. त्याचवेळी कर्णधार इयॉन मॉर्गनच्या पाठदुखीने डोके वर काढले आहे. त्यामुळे तो उद्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दोघांनाही मैदान सोडावे लागले होते. रॉय दोन सामन्यात खेळू शकणार नाही असे सांगताना इंग्लंड संघ व्यवस्थापनाने आम्ही मॉर्गनच्या तंदुरुस्तीकडे लक्ष ठेवून आहोत असे सांगितले. त्याच्या वेदना कमी झाल्या आहेत. सामन्यापूर्वी सकाळी त्याची तंदुरुस्ती चाचणी घेतली जाईल. यात तो अनफिट ठरल्यास इंग्लंडसाठी सामन्यापूर्वीच दुसरा धक्का असेल. मॉर्गन बाहेर राहिल्यास जोस बटलर संघाचे नेतृत्व करेल. रायच्या जागी इंग्लंडने जेम्स व्हिन्सला संघात स्थान दिले आहे. 

इंग्लंडला या सामन्यासाठी तरी खेळाडूंच्या दुखापतींची चिंता नसेल. बाद फेरी लक्षात घेता ते प्रमुख खेळाडूंना आता विश्रांतीचाच विचार करतील. तेवढी व्यावसायिकता त्यांच्यात आहे. 

प्रमुख खेळाडूंशिवाय इंग्लंड संघ मैदानावर उतरले तरी त्यांची ताकद कमी होत नाही. त्यांना रोखण्यासाठी अफगाणिस्तान संघाला आपली सगळी ताकद एकवटावी लागेल. फलंदाजी, गोलंदाजीच्या आघाडीवर त्यांच्यासमोर नक्कीच इंग्लंडचे कठिण आव्हान आहे. एकट्या दुकट्या खेळाडूच्या कामगिरीवर त्यांना हे आव्हान पेलता येणार नाही. यासाठी त्यांना निर्धाराने खेळावे लागेल. 

ढगाळ हवामानातच सामन्याला सुरवा होईल. अधून मधून पावसाची शक्‍यता असून, अशा वातावरणात वेगवान गोलंदाज चमक दाखवू शकतील. पण, मैदानाच्या सीमारेषा लांब असल्यामुळे फिरकी गोलंदाजही एका बाजूने वर्चस्व राखू शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jason Roy ruled out of 2 matches for World Cup 2019