Jemimah Rodrigues : ही इनिंग आहे खूप खास... जेमिमाहने पाकिस्तान विरूद्धची दमदार खेळी कोणाला केली समर्पित? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jemimah Rodrigues T20 World Cup 2023

Jemimah Rodrigues : ही इनिंग आहे खूप खास... जेमिमाहने पाकिस्तान विरूद्धची दमदार खेळी कोणाला केली समर्पित?

Jemimah Rodrigues T20 World Cup 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी 20 वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव केला. भारताने वर्ल्डकप मोहीम विजयाने सुरू केली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 बाद 149 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने हे टार्गेट 19 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 151 धावा करत पार केले.

भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने 38 चेंडूत नाबाद 53 धावा करत भारताचा विजय साकारला. रॉड्रिग्जला शफाली वर्माने 25 चेंडूत 33 धावा तर रिचा घोषने 20 षटकात नाबाद 31 धावा केल्या. सामना झाल्यानंतर जेमिमाहने आपल्या खेळीबद्दल भावना व्यक्त केल्या.

जेमिमाह म्हणाली, 'काय सांगावं हे मला कळत नाहीये. मी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मी बांगलादेश विरूद्धच्या सराव सामन्यातही भागीदारी केली होती. आजही आम्हाला ती करता आली.'

जेमिमाह पुढे म्हणाली, 'ही खेळी माझ्यासाठी खूप खास आहे. मला गेल्या काही काळापासून धावा करता येत नव्हत्या. मात्र मी प्रक्रियेवर कायम राहिले. बाकी सर्व परमेश्वराने सांभाळून घेतले. मी माझी ही खेळी माझ्या कुटुंबियांना समर्पित करते. ते आता स्टेडियममध्ये उपस्थित आहेत.'

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने सामन्यादरम्यान काय थॉट प्रोसेस होती हे सांगितले. ती म्हणाली की आम्हाला प्रती षटक 10 धावांची गरज होती. आम्ही प्रत्येक षटकाचा विचार केला. आम्हाला माहिती होतं की ते षटकात एक तरी लूज बॉल टकातील आणि त्यावर आम्हाला धावा करायच्या होत्या.

मला माहितं होतं की आम्ही सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेलो तर आम्ही जिंकू शकतो. आता आम्ही जिंकलो आहे. आता ही विजयी घोडदौड कायम राखणे गरजचे आहे.

(Sports Latest News)