जितूची पदकाची हॅटट्रिक, पुन्हा सुवर्णवेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत होतो, त्याचे दडपण अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे पदक हुकले. नक्कीच हे सलत आहे.
- अमनप्रीत सिंग

मुंबई - अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सलग दुसऱ्या दिवशी दाखवून देत जितू रायने विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. मंगळवारी स्पर्धेतील गच्छंती ०.२ गुणांच्या फरकाने टाळलेल्या जितूने या वेळी बाद होणारा पाचवा तसेच सहावा स्पर्धक होण्याचे टाळत थेट सुवर्णपदकाचा वेध घेतला. ही कामगिरी त्याने ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत केली.

नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सलग तिसऱ्या दिवशी जितूने पदकाचा वेध घेतला. त्याने सोमवारी हिना सिद्धूच्या साथीत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. ही स्पर्धा चाचणी असल्यामुळे त्या यशाची विश्वकरंडक कामगिरीत नोंद झाली नव्हती; मात्र त्या यशापासून प्रेरणा घेत जितूने मंगळवारी ब्राँझ आणि आज बुधवारी सुवर्णपदक जिंकले. जितूने २३०.१ गुणांचा वेध घेत जागतिक विक्रमी कामगिरी केली. त्याने ही कामगिरी करताना अखेरच्या शॉट्‌सपूर्वीची अमनप्रीतची ०.३ गुणांची आघाडी मोडून काढली. अखेरच्या शॉट्‌समध्ये ८.२ गुणच नोंदवू शकलेला अमनप्रीत २२६.९ गुणांपर्यंत पोचू शकला.

जितू रायचे पदक त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होते. प्राथमिक फेरीत अमनप्रीत पहिला आणि जितू दुसरा होता, पण अंतिम फेरीत त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते. त्याची सुरवात १०.८, ९.८, १०.२, ६.६, १०.३, १०.१, ८.८, ७.४, १०.३, अशी होती. हा अडथळा पार केल्यानंतर त्याची अडखळती वाटचाल सुरूच होती. अखेरच्या आठ शॉट्‌समध्ये त्याने सहा वेळा १० पेक्षा जास्त गुणांची कमाई करीत बाजी मारली. त्यामुळे सुरवातीच्या अडथळ्यानंतर चांगले सातत्य राखलेला अमनप्रीतही पदार्पणाच्या अंतिम फेरीत अव्वल येऊ शकला नाही.

जितू आणि अमनप्रीत सोडल्यास अन्य भारतीय अंतिम फेरीतही गेले नाहीत. मुस्कान (५७६) २५ मीटर पिस्तूलच्या प्राथमिक क्रमवारीत बारावी आली. तिची अंतिम फेरी तीन गुणांनी हुकली. या स्पर्धेत राही सरनोबत (५७१) २३ वी; तर सुरभी पाठक (५७०) २४ वी आली. महिलांच्या स्कीट स्पर्धेत रश्‍मी राठोडचा १७ वा क्रमांक हीच भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ती अंतिम फेरीपासून चार गुणांनी दूर राहिली.

जितू म्हणतो...
 नव्या वर्षातील पहिल्याच स्पर्धेतील सुवर्णपदक सुखावणारे
घरच्या प्रेक्षकांसमोर तिरंगा मानाने फडकावला याचा जास्त आनंद
चांगली सुरवात नव्हती तरी जिंकलो, हीच तर खेळातील अनिश्‍चितता आहे
प्रत्येक शॉट्‌सनंतर होत असलेली प्रगती आत्मविश्वास उंचावते
अखेरपर्यंत लढल्याचा फायदाच होतो, हेच पुन्हा दिसले
अखेरच्या शॉट्‌सपूर्वी पिछाडीवर होतो, पण कोणतेही दडपण नव्हते
अखेरच्या शॉट्‌सच्या वेळी अमनप्रीतवर दडपण आले असणार, त्यामुळे त्याच्याकडून काहीशी चूक झाली व त्याचाही मला फायदा
यंदा प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत एक तरी सुवर्णपदक जिंकण्याचा इरादा आहे.

Web Title: Jitu medal hat-trick