बाद होता होता जितूचा पदकवेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - अंतिम फेरीतील स्थान सुरवातीच्या १२ शॉट्‌सनंतर केवळ ०.२ गुणाने राखलेल्या जितू रायने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ब्राँझपदकाचा वेध घेतला. सुरवातीच्या खराब कामगिरीने दडपण काही प्रमाणात दूर झाले आणि त्यामुळेच पदक जिंकता आले, असे जितू रायने सांगितले.

मुंबई - अंतिम फेरीतील स्थान सुरवातीच्या १२ शॉट्‌सनंतर केवळ ०.२ गुणाने राखलेल्या जितू रायने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ब्राँझपदकाचा वेध घेतला. सुरवातीच्या खराब कामगिरीने दडपण काही प्रमाणात दूर झाले आणि त्यामुळेच पदक जिंकता आले, असे जितू रायने सांगितले.

ऑलिंपिक विजेता होआंग (व्हिएतनाम) या स्पर्धेत रौप्यपदकच जिंकू शकला, याची चर्चा नेमबाजी वर्तुळात सुरू होती; पण दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग नेमबाजी रेंजवर चांगलीच गर्दी केलेल्या चाहत्यांना जितूने सातव्यावरून तिसऱ्या क्रमांकावर घेतलेली झेप जास्त सुखावत होती. जपानच्या मात्सुदा याने अंतिम फेरीत २४०.१ गुणांचा जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकले. जितूने २१६.७ गुणांचा वेध घेतला. 

जितूच अंतिम फेरीचा हिरो होता. पहिल्याच कटऑफच्या वेळी तो ०.२ गुणांनी वाचला आणि चाहत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. त्यानंतर दहाच्या आसपास गुणांचा वेध घेत एकेक क्रमांकाने प्रगती केली. पहिल्या १२ शॉट्‌समध्ये तो सात वेळा दहापासून चुकला होता. यापैकी एक शॉट्‌स तर ८.८ होता. त्यानंतरच्या १२ शॉट्‌समध्ये त्याचे दहापेक्षा गुण पाचदा होते; पण त्याचे पदक २१ व्या तसेच २२ व्या प्रयत्नातील १०.६ गुणांनीच निश्‍चित केले. तोपर्यंत तो ब्राँझपेक्षा जास्त प्रगती करू शकणार नाही, हेही स्पष्ट झाले होते.

चैन सिंग सातव्याचा सातवाच
जितू रायपासून चैन सिंग प्रेरणा घेऊ शकला नाही. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात तो प्राथमिक फेरीत सातवा होता. अंतिम फेरीतही सातवाच राहिला. प्राथमिक फेरीत सुशील घालय बारावा, तर गगन नारंग पंधरावा आला. गगन आणि प्राथमिक फेरीत अव्वल आलेला चीनचा लीऊ युहान यांच्यात ७.५ गुणांचा फरक होता.

हार मानणे आवडत नाही
अखेरपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत, हेच मी ठरवले होते. त्यामुळेच पदक जिंकू शकलो, असे जितू रायने सांगितले. गुणफलकाचा जास्त विचार करत नाही. सुरवातीस अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचेच लक्ष्य होते. अंतिम फेरीतील सुरवातीच्या खराब शॉट्‌सनी दडपण काहीसे दूर झाले, तसेच काय चुकले तेही कळले. ऑलिंपिकनंतरचे हे माझे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक आहे. चॅंपियन ऑफ चॅंपियन झालो आहे. मी कायम सांगतो, मी कुठे आहे, याची चिंता मला नसते. स्पर्धेत राहण्याची जिद्द मी कधीही सोडत नाही, असे त्याने सांगितले.

Web Title: Jitu Rai