किशोरी गटात पुणे संघ विजेता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुलींच्या संघाची या वर्षातील राज्य विजेतेपदाची हॅटट्रिक
मंचर - किशोर गटाच्या 28 व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत किशोर गटात परभणी; तर किशोरी गटात पुणे संघाने विजेतेपद पटकावले. यंदाच्या मोसमात पुण्याच्या मुलींच्या संघाने राज्य विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. या वर्षी पुण्याच्या मुलींनी वरिष्ठ आणि कुमार गटातही विजेतेद पटकावले आहे.

येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेत परभणीने अंतिम लढतीत ठाण्याचे आव्हान 49-31 असे परतवून लावले. किशोरी गटात पुणे संघाने कोल्हापूरचा 28-21 असा पराभव केला.

मुलांच्या अंतिम सामन्याची सुरवात वेगवान होती. दोघांचेही चढाईपटू जोशात होते. परभणीच्या लहू राठोने एकाच चढाईत चार गडी टिपून संघाच्या आघाडीस सुरवात केली. नंतर ठाणे संघावर लोण देत त्यांनी विश्रांतीला 20-18 अशी आघाडी मिळवली. उत्तरार्धात ठाण्याचे प्रतिआक्रमण धारदार ठरले. त्यांनी एकवेळ सामना 24-24 असा बरोबरीत आणला; पण याचवेळी परभणीने ठाणे संघावर दुसरा लोण देत आघाडी मिळवली आणि मागे वळून बघितले नाही. अखेरच्या पाच मिनिटांत त्यांनी ठाणे संघावर आणखी एक लोण देत विजय निश्‍चित केला. लहू राठोड, सचिन डुकरे यांच्या झंझावाती चढायांना बचावात लखन चव्हाण, अमोल राठोड यांची सुरेख साथ मिळाली.

मुलींच्या गटातील अंतिम लढतीस कोल्हापूरने झंझावाती सुरवात केली. त्यांनी खेळ सुरू झाल्यावर पाचच मिनिटांत पुण्यावर लोण दिला. त्यामुळे 9-2 अशी आघाडी घेत त्यांनी यजमानांवर दडपण टाकले; पण पुण्याच्या मुलींनी हे दडपण झुगारून देत पुढच्या पाच मिनिटांत लोण परतवत (12-11) आघाडी मिळवली. त्यानंतर विश्रांतीला पुणे संघाने 15-14 अशी आघाडी मिळवली. सामना अखेरच्या टप्प्यात आला तेव्हाही आघाडी पुणे संघाकडे होती; पण फरक 20-18 असा दोन गुणांचाच होता. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना पुणे संघाने कोल्हापूरवर दुसरा लोण दिला आणि 26-21 अशा आघाडीसह सामना आपल्या नावावर केला.

Web Title: kabaddi competition