एक कोटीच्या कबड्डीपासून महाराष्ट्र दूर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई : हरियानात उद्यापासून (ता. 9) सुरू होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. स्पर्धेत राज्यातील तीन व्यावसायिक संघ; तसेच चांगले संघ नसल्यामुळे संघ न पाठवण्याचे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने ठरवले. स्पर्धेची बक्षीस रक्कम एक कोटी आहे.

मुंबई : हरियानात उद्यापासून (ता. 9) सुरू होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. स्पर्धेत राज्यातील तीन व्यावसायिक संघ; तसेच चांगले संघ नसल्यामुळे संघ न पाठवण्याचे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने ठरवले. स्पर्धेची बक्षीस रक्कम एक कोटी आहे.

राई सोनिपत (हरियाना) येथील मोतीलाल नेहरू स्कूल मैदानावर स्पर्धा होईल. सुरवातीस निश्‍चित केलेल्या गटवारीत महाराष्ट्र 'क' गटात राजस्थान व एअर इंडियासह होता. मात्र, आपल्या संघातील खेळाडू व्यावसायिक संघातून खेळणार हे लक्षात आल्यावर संघ न पाठवण्याचे ठरले. महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशला स्थान मिळाले. 

या स्पर्धेत भारत पेट्रोलियम, एअर इंडिया, महिंद्र हे मुंबईतील स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणारे संघ आहेत. त्याचबरोबर मुंबईतील निमंत्रित संघांत कायम असणारा ओएनजीसी हा संघही आहे. या परिस्थितीत राज्याच्या संघासाठी कोणी खेळाडूच शिल्लक राहिले नव्हते. 

ही स्पर्धा एक तर राज्यांच्या संघांची हवी होती किंवा व्यावसायिक संघांची. आता आमच्या संघातील 95 टक्के खेळाडू व्यावसायिक संघातून खेळत असतात. या परिस्थितीत राष्ट्रीय स्पर्धेतील अव्वल चार संघांमधील एक म्हणून त्या दर्जाचा खेळ करण्याच्या अपेक्षेची पूर्तता करणे अशक्‍यच होते. त्यामुळे आम्ही या स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याचे ठरवले आहे, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी सांगितले. 

हरियाना कबड्डी संघटनेचे अध्यक्ष विजय प्रकाश यांना हे मान्य नाही. आमचेही काही खेळाडू व्यावसायिक संघात गेले आहेत. आम्ही आमच्या संघात चार कुमार खेळाडूंची निवड केली आहे. महाराष्ट्राकडे संघ पाठवण्यासाठी चांगले खेळाडू नाहीत, असे कसे कोणालाही मान्य होईल, अशी विचारणा त्यांनी केली. 

महाराष्ट्राने आपली अनुपलब्धता मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रीय कबड्डी महासंघास कळवली आहे. आम्हाला राष्ट्रीय स्पर्धेच्या तोडीचा संघ पाठवता येणार नाही. त्याचबरोबर संघ तयार करायला पुरेसा वेळही नाही, असे पत्र महाराष्ट्र कबड्डी संघटनेने पाठवल्याचे भारतीय कबड्डी महासंघाचे सहायक सचिव देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही खूपच वेगाने हालचाली करीत नवव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशला या स्पर्धेसाठी तयार केले, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सलामीच्या सामन्यात महिंद्र (वि. सेनादल) आणि भारत पेट्रोलियम (वि. हरियाना) हे मुंबईतील संघ खेळतील. स्पर्धेचे उद्‌घाटन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते होईल. उपविजेत्यास 50 लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 25 लाखांचे बक्षीस आहे. 

स्पर्धेची गटवारी - अ गट : सेनादल, तमिळनाडू, महिंद्र अँड महिंद्र. ब गट : हरियाना, हिमाचल प्रदेश, भारत पेट्रोलियम. क गट : उत्तर प्रदेश, राजस्थान, एअर इंडिया. ड गट : रेल्वे, उत्तराखंड, ओएनजीसी. 

भारतात कोठेही राज्य आणि व्यावसायिक संघांची एकत्रित स्पर्धा झालेली नाही आणि होईल, असे वाटत नाही. सर्व खेळाडू व्यावसायिक संघात गेल्यावर आमच्याकडे अव्वल खेळाडू आहेत कुठे? कामगिरी खराब झाली असती तरी टीका झालीच असती. 
- दत्ता पाथ्रीकर, राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष. 

महाराष्ट्राने चांगले खेळाडू नाहीत हे सांगून माघार घेत असल्याचे कळवल्यावर धक्काच बसला. महाराष्ट्रात कबड्डी लोकप्रिय आहे. तिथे खेळाडू नाहीत, यावर विश्‍वासच बसत नाही. एक कोटीच्या स्पर्धेसाठी आपला संघ पात्र ठरला आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र माघार घेईल, असे वाटले नव्हते. 
- विजय प्रकाश, हरियाना कबड्डी संघटनेचे अध्यक्ष. 

राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या संघातील चार खेळाडूंना बदलण्याची मुभा दिली होती. त्यांनी आमचे खेळाडू व्यावसायिक संघातून खेळत आहेत, हे सांगितले; तसेच पर्यायी संघ तयार करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही, असेही पत्र पाठवले आहे. या परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. 
- देवराज चतुर्वेदी, भारतीय कबड्डी महासंघाचे सहायक सचिव.

Web Title: Kabaddi Professional Kabaddi Maharashtra sports