
Kabaddi : ज्युनियर जागतिक कबड्डीत इराणला हरवून भारत विजेता
उरमिया : पिछाडीनंतरही भारताच्या कबड्डीपटूंनी तुफानी खेळ करत यजमान इराणचा ४१-३३ असा पराभव केला आणि दुसऱ्या ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवले. पहिली स्पर्धासुद्धा इराणमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यात इराणच विजेता ठरला होता.
उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता तर इराणने नेपाळचा सहज पराभव पहिल्या सत्रात इराणचे खेळाडू जोरदार खेळ करत होते, तसेच पंचांशी वारंवार हुज्जतही घालत होते. वादग्रस्त आणि संघर्षपूर्ण खेळाच्या पहिल्या सत्रात इराणचा संघ भारतापेक्षा काकणभर सरस ठरला. एवढेच नव्हे तर पहिल्या दहा मिनिटांतच भारतावर लोण चढवण्याचाही करिष्मा इराणने दाखवल्यामुळे मध्यंतराला इराण १९-१८ असा आघाडीवर होता.
मध्यंतरानंतर भारताने वेगळी रणनीती आजमावत इराणच्या बचावफळीवर हल्ला चढवला. नरेंदर कंडोला, मनजीत शर्मा आणि जय भगवानने आपल्या आक्रमक चढाईच्या जोरावर इराणवर लोण चढवत आघाडी घेतली. शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना भारत ३३-३० असा आघाडीवर होता. पण या पाच मिनिटांत त्यांनी भन्नाट चढाया आणि सुपर टॅकल करत सामन्यावर पकड मिळवली.