Asia Cup 2023: 'वर्ल्ड चॅम्पियन तरी आम्हाला इज्‍जत नाही...' पाकचा माजी खेळाडूचे रडगाणे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pakistan Asia Cup 2023

Asia Cup 2023: 'वर्ल्ड चॅम्पियन तरी आम्हाला इज्‍जत नाही...' पाकचा माजी खेळाडूचे रडगाणे!

India vs Pakistan Asia Cup 2023 : या वर्षी होणार्‍या आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे प्रकरण जोरात सुरू आहे. भारताच्या नकारानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ उडाली होती.

पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आणि विद्यमान प्रमुख नजम सेठी यांनीही धमकी दिली. पीसीबीचे म्हणणे आहे की, जर टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आली नाही तर पाकिस्तानचा संघ या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार्‍या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्येही सहभागी होणार नाही. आता बीसीसीआयला धमकी देणाऱ्यांच्या यादीत कामरान अकमलचाही समाविष्ट झाला आहे.

पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल यानेही हीच भावना व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अकमलने सांगितले की जर मेन इन ब्लूने आशिया कपमधून माघार घेतली तर पाकिस्तानने भारतात जाऊ नये. आम्हालाही आदर आहे. आम्ही जगज्जेतेही झालो आहोत. चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे आणि सर्व फॉरमॅटमध्येही अव्वल आहे.

आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत या महिन्याच्या सुरुवातीला बहरीन येथे झालेली आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक अनिर्णित राहिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान दौऱ्यासाठी सरकारकडून मान्यता मिळणार नाही. त्याचवेळी पीसीबीचे म्हणणे आहे की त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसह अनेक देशांचे यशस्वी दौरे आयोजित केले आहेत, त्यामुळे टीम इंडियानेही पाकिस्तानात यावे.

आशिया चषक स्पर्धेसाठी विचारात घेतलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार भारतीय संघ आपले सामने यूएईमध्ये खेळेल, तर उर्वरित देश पाकिस्तानला जाऊ शकतात. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान सामना यूएईमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव आहे. जर दोन्ही देश उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचले तर हे सामने यूएईमध्येही होऊ शकतात.