IND Vs NZ : कानपूरमध्ये लागत नाही निकाल!; भारताला रेकॉर्ड कायम ठेवण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and New Zealand

कानपूरमध्ये लागत नाही निकाल!; रेकॉर्ड कायम ठेवण्याचे आव्हान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कानपूर : कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियम हे भारतातील सर्वांत जुन्या कसोटी खेळण्याच्या मैदानांपैकी एक आहे. कानपूरच्या स्टेडियममध्ये (Kanpur Test) भारतीय संघाची कामगिरी नेत्रदीपक आहे. या मैदानावर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने दोन जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. तसेच १९८३ नंतर भारताने एकही सामना येथे गमावलेला नाही. गुरुवारपासून (ता. २५) सुरू होणाऱ्या कसोटीत हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचे आव्हान भारतासमोर राहणार आहे.

जानेवारी १९५२ मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात इंग्लंडने ८ गडी राखून विजय मिळवला होता. या पराभवानंतर मैदानावर सहा वर्षांनी कसोटी खेळली गेली. १९५८ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरला. या सामन्यात भारताला २०३ धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: IPL 2022 : २ एप्रिलला खेळला जाईल आयपीएल २०२२चा पहिला सामना!

भारतीय संघाला डिसेंबर १९५९ मध्ये ग्रीनपार्क स्टेडियमवर पहिला विजय मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारताने ११९ धावांनी जिंकला होता. या सामन्यात भारताचा ऑफस्पिनर जसुभाई पटेलने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ६९ धावांत ९ बळी घेतले. या विजयानंतर हे मैदान भारतीय संघासाठी खूप यशस्वी ठरले आणि टीम इंडियाने ग्रीनपार्क स्टेडियमवर १९८३ पर्यंत एकही कसोटी सामना गमावला नाही.

१९८३ मध्ये झाला शेवटचा पराभव

१९८३ मध्ये वेस्ट इंडिजने भारताचा एक डाव आणि ८३ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात गॉर्डन ग्रीनिजने १९४ धावांची शानदार खेळी केली होती. यासोबतच संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग या जोडीने ग्रीनीजच्या मोठ्या खेळीनंतर भारतीय संघाला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.

हेही वाचा: ‘...तर ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असेल कर्णधाराविना’

अनिर्णित कसोटींची संख्या जास्त

भारतीय संघाने ग्रीनपार्क स्टेडियमवर २२ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ७ सामने भारताने जिंकले तर तीन सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले. या मैदानावर अनिर्णित होणाऱ्या कसोटींची संख्या जास्त आहे. या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने दोन जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला.

तो ५०० वा सामना

ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळली गेलेली शेवटची कसोटीही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली गेली. हा सामना भारतीय संघाचा ५०० वा कसोटी सामना होता. १९८३ नंतर या मैदानावर कोणत्याही संघाला भारताला हरवता आलेले नाही.

loading image
go to top