भारताचा दुसरा त्रिशतकवीर करुण नायर

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात सोमवारी कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत. 

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात सोमवारी कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस भारतीय विक्रमांचा ठरला. नायरच्या त्रिशतकी खेळीनंतर 7 बाद 759 धावसंख्येवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. नायरने देखील भारताचा सर्वात तरुण त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला. सेहवागने (25 वर्षे 160 दिवस) 2004 मध्ये पहिले त्रिशतक ठोकले होते. 

कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताची 9 बाद 726 ही सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये मुंबईत भारताने ही कामगिरी केली होती. याच कसोटीत भारताने आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद पहिल्यांदा पटकावले. त्याच सामन्यात सेहवाग (293) तिसऱ्या त्रिशतकापासून दूर राहिला होता. 

नायरने आतापर्यंत भारताकडून केवळ दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. इंग्लंडविरुद्ध शिखर धवन अनफिट झाल्यामुळे करुण नायरला संघात स्थान मिळाले. 
या सामन्यापूर्वी त्याने कसोटीत केवळ 4 आणि 17 धावा केल्या होत्या. या पहिल्या वहिल्या शतकी खेळीला त्रिशतकाची झालर देताना नायरने चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलच्या साथीत 161, अश्‍विनच्या साथीत सहाव्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी केली. या खेळीत करुणला वैयक्तिक 34 आणि 217 धावांवर जीवदान मिळाले. त्यानंतर 246 धावांवर तो यष्टिचित होता होता वाचला. पण, हे अपवाद ठरले. त्याने कमालीच्या जिद्दीने आपली त्रिशतकी खेळी सजवली. 

एक विक्रमी दिवस 

 • भारताची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या (7 बाद 759) 
 • कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या 
 • इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडी मोठ्या फरकाने भरून काढली 
 • करुण नायरचे (नाबाद 303) त्रिशतक. भारताकडून कसोटी क्रिकेटमधील तिसरी घटना 
 • कसोटीत त्रिशतक झळकावणारा दुसरा भारतीय 
 • पहिल्या शतकी खेळीचे त्रिशतकात रुपांतर करणारा पहिला भारतीय 
 • 25 वर्षे आणि 13 दिवस. त्रिशतक झळकावणारा पहिला युवा भारतीय फलंदाज 
 • पहिल्याच शतकी खेळीत (नाबाद 303) सर्वोच्च खेळी करणारा नायर पहिला आशियाई खेळाडू 
 • पाचव्या क्रमांकावर येऊन त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय 
   
Web Title: karan nair second indian batsman to hit triple century