क्रिकेट बरेच काही शिकवते : केदार जाधव

सुनंदन लेले
रविवार, 23 जून 2019

आम्ही उभारलेला धावफलक कमाल नसला तरी एकदम तुटपुंजा नव्हता. खास करून आमच्याकडे जे गोलंदाज आहेत त्याचा विचार करता अफगाणिस्तान÷च्या फलंदाजांना झगडावे लागणार हे नक्की होते. ज्याला आम्ही डेथ ओव्हर्स म्हणतो त्या शेवटच्या 10 षटकात जसप्रीत बुमरा आणि शमीला खेळून 8 पेक्षा जास्त धावांची सरासरी राखणे किती कठीण जाईल हे जाणून होतो.

साउदम्पटन : जगभरातील भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी शनिवारच्या विजयानंतर सुटकेचा श्वास घेतला असणार. सामन्यानंतर केदार जाधवशी बोलणे झाले तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर आनंद समाधान आणि ‘सुटका’ असे मिश्र भाव होते. ‘‘आपल्याला वाटते पण प्रत्येक सामन्यातून क्रिकेट बरेच काही शिकवते. शनिवारचा अफगाणिस्तान समोरचा सामना त्याला अपवाद नव्हता. सगळ्यांना वाटले होते हा सोपा पेपर असेल. क्रिकेटने अशी काही गणितं पेपरात टाकली की सोडवता सोडवता नाकी नऊ आले’’, केदार जाधव ‘सकाळ’शी बोलताना म्हणाला.

‘‘अफगाणिस्तानसमोरच्या सामन्यात आम्ही आरामात जिंकू या विचारात नक्की नव्हतो. साउदम्पटनची खेळपट्टी कमालीची संथ होती. त्यांचे सगळे गोलंदाज मंद मध्यमगती होते. त्यांनी अजून मार्‍यातील वेग कमी केला. घाईगडबड करून सुरुवातीला विकेट गमावायच्या नाहीत या विचाराने फलंदाज थोडे सावध खेळले. नंतर मी फलंदाजीला गेलो तेव्हा समजले की चेंडू बॅटवर येतच नाहीये. जर चेंडूला वेग नसला तर साउदम्पटनसारख्या मोठ्या मैदानावर मोठे फटके म्हणजे षटकार मारणे कठीण जाते. मी फक्त खेळपट्टीवर उभा राहून 250च्या जवळची धावसंख्या गाठायचा विचार करून खेळत होतो’’, केदार सांगत होता.

सामन्याच्या उत्तरार्धाबाबत बोलताना केदार म्हणाला, ‘‘आम्ही उभारलेला धावफलक कमाल नसला तरी एकदम तुटपुंजा नव्हता. खास करून आमच्याकडे जे गोलंदाज आहेत त्याचा विचार करता अफगाणिस्तान÷च्या फलंदाजांना झगडावे लागणार हे नक्की होते. ज्याला आम्ही डेथ ओव्हर्स म्हणतो त्या शेवटच्या 10 षटकात जसप्रीत बुमरा आणि शमीला खेळून 8 पेक्षा जास्त धावांची सरासरी राखणे किती कठीण जाईल हे जाणून होतो. झाले तसेच. बुमराने 19व्या षटकात सलग 6 यॉर्कर टाकले आणि मग शमी हॅटट्रीक साधून काम फत्ते केले.अफगाणिस्तानसमोरचा विजय गोलंदाजांनी खेचून आणला हे म्हणताना मला अभिमान वाटतो’’, केदार जाधव बुमरा - शमी जोडीचे कौतुक करताना म्हणाला. थोडक्यात फलंदाजांकरता शमी ‘शनी’ बनला का, असे विचारता केदार जाम हसू लागला.

2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने 5 सामन्यात अविजीत राहण्याचे सत्र चालू ठेवले. अफगाणिस्तान संघाने भारतीय संघाला फोडलेला घाम संघाच्या पुढच्या प्रवासाकरता चांगलाच ठरेल असे टीव्ही समालोचन करणार्‍या सगळ्या माजी खेळाडूंचे म्हणणे होते. साखर झोपेतून खडबडून जागे करणारा हा सामना भारतीय संघाला पुढील लढतींकरता सतर्क राहायला मदत करेल असे वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedar Jadhav feels expression after India win against Afghanistan