केदारचा स्पेल टर्निंग पॉइंट ठरला : विराट कोहली 

शुक्रवार, 16 जून 2017

"बांगलादेशने चांगल्या खेळपट्टीचा फायदा घेऊन सकारात्मक सुरुवात केली होती. डावाच्या मध्याला त्यांचा धावफलक सुदृढ दिसत होता. त्या वेळी धोनीशी चर्चा करून मी केदार जाधवला गोलंदाजी दिली आणि त्याने एक नाही तर दोनही स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद करून कमाल केली. केदारचा तो स्पेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला'', विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितले. 

"बांगलादेशने चांगल्या खेळपट्टीचा फायदा घेऊन सकारात्मक सुरुवात केली होती. डावाच्या मध्याला त्यांचा धावफलक सुदृढ दिसत होता. त्या वेळी धोनीशी चर्चा करून मी केदार जाधवला गोलंदाजी दिली आणि त्याने एक नाही तर दोनही स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद करून कमाल केली. केदारचा तो स्पेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला'', विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितले. 

केदार जाधवला भेटलो असता तो म्हणाला,"मला गोलंदाजीकरता चेंडू सोपवताना विराट म्हणाला की मला चौकार नसणाऱ्या तीन षटकांची अपेक्षा आहे तुझ्याकडून. धोनीशी बोलून मग आम्ही योजना आखली. नंतर धोनी आणि माझ्यात संवाद नव्हता पण डोळ्यांच्या खाणाखुणांनी आम्ही संपर्कात होतो. ज्याला मी क्रिकेटचा ब्लुटूथ म्हणेन. फलंदाज काय विचार करतोय...पुढच्या चेंडूवर काय करायची शक्‍यता आहे हे आम्ही नजरेने खुणावत होतो एकमेकांना. दोनही जम बसलेल्या फलंदाजांना मला बाद करता आले ज्याने धावगतीला ब्रेक लागले. संघ विजयी होत असताना आपण काहीतरी योगदान देऊ शकलो याचे मला समाधान आहे'', केदार जाधवने म्हणाला. 

""केदार अत्यंत हुशार क्रिकेटर आहे. तो निरीक्षण करून बरोबर फलंदाजाला जाळ्यात सापडवतो. उंची कमी असल्याने त्याने टाकलेला चेंडू पटकन बॅटच्या तडाख्यात येत नाही. आमच्यात नजरेने संवाद असतो आणि केदारला मला काय म्हणायचे आहे हे बरोबर कळते'', धोनीने सांगितले. 

भारतीय संघाने बांगलादेशला सपशेल चीतपट केल्याने बांगलादेशी पाठीराख्यांची नेहमीची टिवटिव यावेळी बंद होती." संपूर्ण क्रिकेटचे दर्शन घडवणारा सामना आम्ही खेळलो. बुमराह आणि भुवनेश्‍वरने परत एकदा टप्पा धरून गोलंदाजी केली. चांगल्या विकेटवर आम्ही मधल्या टप्प्यात बांगलादेशी फलंदाजांना जास्त पुढे जाऊन दिले नाही तिथेच सामना भारताकडे फिरला. नंतर शिखर आणि रोहितने सहजसुंदर फलंदाजी केली. मला माझे शतक पूर्ण न झाल्याचे अजिबात वाईट वाटत नाही. संघाने जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्याच्या घडीला आम्ही खरच चांगले भक्कम क्रिकेट खेळत आहोत. रोहितची आजची फलंदाजी बघण्यालायक होती. शिखरने आणि रोहितने अशी काही दणक्‍यात सुरुवात करून दिली की माझा आत्मविश्‍वास वाढला आणि मैदानात उतरल्यापासून मी मोकळी फटकेबाजी करू शकलो'', विराटने विजयाचा आनंद व्यक्त करताना सांगितले. 

बांगलादेशी कप्तान मशरफी मुर्तुझा सामन्यानंतर भेटला तेव्हा भारतीय संघाच्या तडाख्याने हताश झालेला दिसला." तमीम - मुश्‍फीकुरच्या भागीदारीनंतर आम्ही मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे होते. 300 धावा केल्या असत्या तरच भारतीय फलंदाजांवर थोडेतरी दडपण आम्ही टाकू शकलो असतो. चालू स्पर्धेतील विकेटस्‌ अशी आहेत की सामना चालू झाला की पहिल्या 7-8 षटकांपर्यंतच गोलंदाजांना थोडी मदत मिळते नंतर फलंदाज आपले वर्चस्व गाजवतात. भारतीय फलंदाजांचा सध्याचा फॉर्म बघता त्यांच्याकरता 265 धावांचे आव्हान पुरेसे नव्हते'', बांगलादेशी कप्तानाने कबुली दिली. 

शुक्रवारी विश्रांती घेऊन भारतीय संघ शनिवारी सराव करून अंतिम सामन्याच्या तयारीला लागणार आहे. 

श्रेय प्रशिक्षकांचे आहे 
चॅंम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय फलंदाजांच्या बॅटच्या तडाख्यातून समोर आलेला प्रत्येक संघ होरपळून निघाला आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा सोबत कप्तान विराट कोहली सातत्याने अशी काही बहारदार फलंदाजी केली आहे की मधल्या फळीतील फलंदाजांना पुरेशी संधीच मिळालेली नाही. ""हे सारे श्रेय फलंदाजी शिकवणाऱ्या प्रशिक्षकांचे आहे. संजय बांगर यांनी मला इतकी मदत केली आहे तंत्र बरोबर करायला की बोलायची सोय नाही. इंग्लंडला येण्याअगोदर आम्ही मुंबईत बीकेसी संकुलातील सराव सुविधेत जाऊन तीन तीन तास सराव केला. इंग्लंड मधील खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना काय छोटे बदल तंत्रात करायचे याचा विचार करून सराव केला ज्याचा आता फायदा होतोय. नुसते संजय बांगर नाही तर मला थ्रो डाऊन करणाऱ्या रघूचेही कौतुक करायचे आहे. रघू आम्हांला तासन्‌तास वेगाने चेंडू टाकून सराव देतो. त्याच्या खांद्यात अजब ताकद आहे. 150 किलोमीटरच्या वेगाने त्याने चेंडू टाकून सराव दिला की मैदानात 140च्या वेगाने येणारा चेंडू खेळताना गडबड होत नाही. म्हणून फलंदाजीतील यशाचे श्रेय मी संजय बांगर आणि रघूच्या मेहनतीला देईन'', विराट कोहलीने सांगितले.  
 

Web Title: Kedar's spell turns point: Virat Kohli