केरळच्या 40 खेळाडूंना राज्यातील पुराची चिंता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जाकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केरळमधील चाळीस खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यांना आपल्या घरची चिंता सतावत आहे. येथे आलेल्या भारतीय पत्रकारांच्या माध्यमातून ते माहिती घेत आहेत. 

जाकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केरळमधील चाळीस खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यांना आपल्या घरची चिंता सतावत आहे. येथे आलेल्या भारतीय पत्रकारांच्या माध्यमातून ते माहिती घेत आहेत. 

ऍथलेटिक्‍स, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, जलतरण, हॉकी या खेळांत प्रामुख्याने केरळचे खेळाडू आहेत. केरळबाबतच्या पुराच्या बातम्या ऐकून त्यांची चिंता वाढतच आहे. "माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत, पण अनेक नातेवाईक, मित्रांना पुराचा फटका बसला आहे. परिस्थिती एवढी वाईट असेल, असे वाटले नव्हते,' असे चारशे मीटर शर्यतीतील धावक महम्मद आनसने सांगितले. त्याचे घर केरळची राजधानी तिरुवअनंतपूरम नजीकच्या निलामेल गावात आहे. तिथे पुराचा जास्त फटका बसला नाही. 

जलतरणपटू साजन प्रकाश एवढा सुदैवी नाही. त्याला घरच्यांबरोबर काही दिवस संपर्कच नाही, पण तरीही त्याने हे सर्व विसरून राष्ट्रीय विक्रम केला. "एका पत्रकाराने माझ्या आईशी संपर्क साधला. ती तमिळनाडूत सुरक्षित आहे, पण आमचे अनेक नातेवाईक केरळमध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्कच साधता येत नाही,' असे त्याने सांगितले. साजनचे कुटुंबीय पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या इडुक्की जिल्ह्यातील आहेत. 

भारतीय हॉकी कर्णधार श्रीजेशची सासूरवाडी इडुक्कीची आहे. तिथे जबरदस्त नुकसान झाले आहे, त्याचबरोबर श्रीजेशचे घरही पाण्यात होते. सर्व भारतीयांनी एकत्र येऊन केरळला साह्य करावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. 

एशियाडसाठी आलेल्या खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांची माहिती देण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. 
- ब्रिजभूषण शरण, भारतीय पथकप्रमुक. 

Web Title: Kerala's 40 players are worried about flooding in the state