नगर, पुणे, उपनगरची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

सांगली - येथे सुरू असलेल्या ३४व्या किशोर गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटातून पुणे, नगर, मुंबई उपनगर, सोलापूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात प्रमुख संघांची आगेकूच सुरू असतानाच पालघरने बलाढ्य ठाण्यावर सनसनाटी विजय मिळविला.

सांगली - येथे सुरू असलेल्या ३४व्या किशोर गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटातून पुणे, नगर, मुंबई उपनगर, सोलापूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात प्रमुख संघांची आगेकूच सुरू असतानाच पालघरने बलाढ्य ठाण्यावर सनसनाटी विजय मिळविला.

मुलींच्या गटात पालघरने ठाण्याचे आव्हान १८-१६ असे दोन गुणांनी मोडून काढले. पालघरच्या विजयात श्रद्धा पारधी हिची कामगिरी लक्षणीय ठरली. तिने अलाहिदा डावात महत्त्वाच्या क्षणी दोन मिनिटे बचाव केला आणि संपूर्ण सामन्यात आपल्या धारदार आक्रमणाने सात गडी टिपले. श्रद्धाला प्रियंका कामडी, अश्‍विनी निशाद आणि अश्‍विमी कामडी यांची साथ लाभली. पुण्याच्या मुलींनी लातूर संघाचा २८-२ असा १ डाव २६ गुणांनी धुव्वा उडवला. पुण्याच्या मुलींच्या धारदार आक्रमणासमोर लातूरचा निभाव लागला नाही. पुण्याने पहिल्याच डावात २८ गुण मिळवून विजय निश्‍चित केला. त्यानंतर लातूरला दोन्ही डावात मिळून केवळ दोन गुण मिळवता आले. 

मुलांच्या गटातूनही आगेकूच करताना पुण्याने पालघरला १२-११ असे एक डाव १ गुणाने हरवले. विवेक ब्राह्मणे, अनिकेत बबले यांचा चौफेर खेळ पुण्याच्या विजयात निर्णायक ठरला. मुलींच्या गटाप्रमाणे मुलांच्या गटातही मुंबई शहरचे आव्हान संपुष्टात आले. 

अन्य निकाल : 
 मुले ः सोलापूर वि.वि. मुंबई शहर (१०-७, १ डाव ३ गुणांनी), मुंबई उपगनर वि.वि. परभणी (१३-४, १ डाव ९ गुणांनी), नगर वि.वि. रायगड (१५-७, १ डाव ८ गुणांनी), औरंगाबाद वि.वि. नाशिक (११-९, दोन गुणांनी), उस्मानाबाद वि.वि. बीड (२३-१५, ८ गुणांनी), ठाणे वि.वि. रत्नागिरी (१३-११, २ गुणांनी), सांगली वि.वि. सातारा (१२-११, एका गुणाने)  मुली ः सांगली वि.वि. जळगांव (१६-४, १ डाव १२ गुणांनी), नाशिक वि.वि. रत्नागिरी (११-१०, एका गुणाने), उस्मानाबाद वि.वि. औरंगाबाद (९-६, १ डाव ३ गुणांनी), नगर वि.वि. मुंबई शहर (१०-६, १ डाव ४ गुणांनी), सातारा वि.वि. मुंबई उपगनर (१६-६, १ डाव १० गुणांनी)

Web Title: Kho-Kho Championship sangli news