महाराष्ट्र, कोल्हापूरची विजयी सलामी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

उस्मानाबाद - भारतीय खो-खो महासंघाच्या 27व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसह कोल्हापूर, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक संघांनी विजयी सलामी दिली. 

उस्मानाबाद - भारतीय खो-खो महासंघाच्या 27व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसह कोल्हापूर, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक संघांनी विजयी सलामी दिली. 

धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत वर्चस्व राखून मिळविलेले विजय महाराष्ट्राच्या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले. पुरुषांच्या विभागात महाराष्ट्राने पहिल्या लढतीत दिल्लीचा 18-2 असा सोळा गुणांनी फडशा पाडला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने पश्‍चिम बंगालचे आव्हान 10-9 असे मोडून काढले. महाराष्ट्राच्या संघाकडून हर्षद हातणकर (3.30 मिनिटे) याच्या बचावाबरोबर उत्तम सावंत (3.20 मिनिटे, 3 गडी), मिलिंद चावरेकर (2.30 मिनिटे आणि 3 गडी) यांचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. 

महिलांच्या विभागात महाराष्ट्राने ओडिशाचा 10-7 असा 1 डाव आणि 3 गुणांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर लगेच झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी हरियानाचे आव्हान 11-1 असे सहज परतवून लावले. बचावाला मिळालेली धारदार आक्रमणाची साथ महिलांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. हरियानाविरुद्धच्या लढतीत प्रियंका भोपी हिने नऊ मिनिटांच्या डावात 6.10 मिनिटे पळती करून प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. उर्वरित वेळ 2.50 मिनिटे श्रुती सकपाळने खेळून काढली. आक्रमणात सारिका काळे हिने 3 गुण नोंदवले. 

पुरुष विभागातील "ब' गटाच्या लढतीत कोल्हापूरने झारखंडचा 15-2 असा एक डाव 13 गुणांनी धुव्वा उडवला. कोल्हापूरकडून सागर पोतदार आणि उमेश सातपुते यांचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. सागरने 3.30 मिनिटे पळती केली. त्यानंतर त्याने 4 गडी बाद केले. उमेशने तेवढाच वेळ पळती करून बचाव भक्कम राखला. आक्रमणात त्याने दोन गडीदेखील बाद केले. अन्य एका लढतीत कर्नाटकाने हरियानाचे आव्हान 10-7 असे एक डाव 3 गुणांनी परतवून लावले. 

महिला विभागात पश्‍चिम बंगाल आणि विदर्भ सामना रंगतदार झाला. मध्यंतराची 5-6 अशी एका गुणाची पिछाडी भरून काढत त्यांनी विदर्भावर 10-9 असा एका गुणाने पराभव केला. मेधा दाश (3.20 मिनिटे) आइण केया मोंडल (3.40 मिनिटे) यानी दुसऱ्या डावात केलेला बचाव निर्णायक ठरला.

Web Title: Kho-Kho Federation Cup