आशियाई स्पर्धेनंतरच खो-खो लीग रंगणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

एप्रिलमध्ये गाजावाजा करून घोषणा करण्यात आलेली खो-खो लीग फेब्रुवारीच्या उत्तरार्धात होण्याची शक्‍यता आहे, पण त्यापूर्वी आशियाई खो-खो स्पर्धा होणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई": एप्रिलमध्ये गाजावाजा करून घोषणा करण्यात आलेली खो-खो लीग फेब्रुवारीच्या उत्तरार्धात होण्याची शक्‍यता आहे, पण त्यापूर्वी आशियाई खो-खो स्पर्धा होणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय खो-खो लीगबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, पण त्याचबरोबर आम्ही दक्षिण आशियाई तसेच आशियाई स्पर्धेच्या तारखाही ठरवत आहोत. आशियाई स्पर्धा झाल्यावरच खो-खो लीग होणार आहे. हा सर्व कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर करण्यात येईल, असे भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी सांगितले.

आम्ही विविध स्पर्धांचा कार्यक्रम तयार करण्यासाठी चर्चा करीत आहोत. त्यानुसार आशियाई खो-खो स्पर्धा नवी दिल्लीत जानेवारीत घेण्याचे ठरवत आहोत. ही स्पर्धा बहुधा 28 जानेवारीस सुरू होईल. अर्थात, अंतिम कार्यक्रम सर्व सहभागी देशांबरोबर चर्चा केल्यानंतरच ठरवणार आहोत, असे त्यागी यांनी सांगितले.

आशियाई स्पर्धा झाल्यावरच खो-खो लीग होईल. ही लीग 14 फेब्रुवारीपासून होण्याची दाट शक्‍यता आहे. आमची याबाबत सहभागी संघ तसेच अन्य सहभागी व्यक्तींबरोबर चर्चा सुरू आहे. अंतिम कार्यक्रम काही दिवसांतच ठरेल आणि तो तुम्हाला कळवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kho-kho league after asian championship