"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

श्रीकांत याने ताकदवान "स्मॅशेस व बॅकहॅंड्‌स'चा भरपूर वापर करत अवघ्या 40 मिनिटांत युकी याला परास्त केले. पहिल्या गेममध्ये श्रीकांत व युकी यांच्यात 5-5 अशी बरोबरी होती. मात्र यानंतर श्रीकांत याने अफाट वेगात खेळत अवघ्या 15 मिनिटांत हा गेम खिशात घातला

नवी दिल्ली - सध्या कारकिर्दीमधील आत्तापर्यंतचा सर्वोच्च क्षण अनुभवत असलेल्या किदंबी श्रीकांत याने आज (शनिवार) ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाकेबाज धडक मारली.

श्रीकांत याने चीनच्या चौथ्या मानांकित शी युकी याला 21-10,21-14 असे सहजी नमविले. सिंगापूर ओपन व इंडोनेशिया ओपन या स्पर्धांनंतर श्रीकांत याने आता या स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर येथे उपविजेतेपदावर सामाधान मानाव्या लागलेल्या श्रीकांत याने इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

श्रीकांत याने याआधी युकी याला सिंगापूर ओपनमध्येही पराजित केले होते. यावेळीही श्रीकांत याने ताकदवान "स्मॅशेस व बॅकहॅंड्‌स'चा भरपूर वापर करत अवघ्या 40 मिनिटांत युकी याला परास्त केले. पहिल्या गेममध्ये श्रीकांत व युकी यांच्यात 5-5 अशी बरोबरी होती. मात्र यानंतर श्रीकांत याने अफाट वेगात खेळत अवघ्या 15 मिनिटांत हा गेम खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये युकी याने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये असलेल्या श्रीकांतपुढे हा प्रयत्न अगदीच तोकडा ठरला!

Web Title: Kidambi Srikanth sails into Australian Open Super Series final