भारताच्या किदंबी श्रीकांतचा ऐतिहासिक विजय

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

सकाई याने दुसऱ्या गेममध्ये चांगली सुरुवात केली होती. मात्र गेममध्ये 13-13 अशी स्थिती असताना "टर्निंग पॉईंट' आला. या विजयाचा मला अतिशय आनंद झाला असून मी माझ्या चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो

जकार्ता - जपानच्या काझुमासा सकाईचा 21-11,21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताच्या किदंबी श्रीकांतने आज (रविवार) इंडोनेशिया सुपर सिरीज प्रिमियर स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या विजयाबरोबरच श्रीकांत हा ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.

सरळ गेममध्ये विजय मिळविलेल्या श्रीकांत याने पहिल्या गेममध्ये सकाई याला कोणतीही संधी दिली नाही. पूर्ण वर्चस्व राखलेल्या श्रीकांत याने हा गेम 21-11 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सकाई याने जोरदार संघर्ष करत 11-6 अशी आघाडी मिळविली. परंतु श्रीकांत याने योग्य वेळी खेळ उंचावत गेममध्ये 13-13 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या गेममध्ये आश्‍वासक पुनरागमन केलेल्या श्रीकांत याने एका ताकदवान "बॉडी स्मॅश'सहित हे ऐतिहासिक विजेतेपद मिळविले.

"सकाई याने दुसऱ्या गेममध्ये चांगली सुरुवात केली होती. मात्र गेममध्ये 13-13 अशी स्थिती असताना "टर्निंग पॉईंट' आला . याआधी मी सिंगापूर येथे अंतिम सामना खेळलो होतो. आता मी येथे स्पर्धा जिंकलो आहे. या विजयाचा मला अतिशय आनंद झाला असून मी माझ्या चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो,'' असे श्रीकांत याने सामन्यानंतर बोलताना सांगितले 

Web Title: Kidambi Srikanth wins Indonesia SSP