IPL 2019 :राहुल, मयांकच्या खेळीने पंजाब हैदराबादविरुद्ध सरस

मंगळवार, 9 एप्रिल 2019

प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड वॉर्नरच्या खेळीने 4 बाद 150 धावांची मजल मारता आली. त्यानंतर पंजाबने अतिघाईत विजय कठिण करत एक चेंडू शिल्लक असताना 4 बाद 151 धावा केल्या. रायजर्ससाठी वॉर्नर जसा अखेरपर्यंत लढला, तसाच राहुल पंजाबसाठी लढला हेच या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. 

चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड वॉर्नरच्या खेळीने 4 बाद 150 धावांची मजल मारता आली. त्यानंतर पंजाबने अतिघाईत विजय कठिण करत एक चेंडू शिल्लक असताना 4 बाद 151 धावा केल्या. रायजर्ससाठी वॉर्नर जसा अखेरपर्यंत लढला, तसाच राहुल पंजाबसाठी लढला हेच या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. 

विजयासाठी पंजाबला आव्हान नक्कीच मोठे नव्हते. पण, त्यांनी ख्रिस गेलला लवकर गमावले. या धक्‍क्‍याचा पंजाबच्या डावावर परिणाम झाला नाही. एकत्र आलेल्या कर्नाटकाच्या राहुल, मयांक जोडीने संयमाला वेळेवर आक्रमकतेची जोड देत पंजाबचा डावच नाही, तर विजय बांधला. दोघांनी अर्धशतके झळकावली. मयांकने अर्धशतकानंतर टॉप गियर टाकण्याचा प्रयत्न केला. पण, या नादात तो आपली विकेट गमावून बसला. त्याने 43 चेंडूंत 55 धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. यंदाच्या आयपीएलमधील अखेरच्या षटकातील नाट्य या सामन्यातही रंगले. विजयासाठी 18 चेंडूंत 19 धावांची आवश्‍यकता असताना संदीप शर्माने 18व्या षटकांत पहिल्या आणि सहाव्या चेंडूंवर मयांक, डेव्हिड मिलर यांना बाद केले. विजयासाठी 12 चेंडूंत 16 धावांची गरज असताना 19व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सिद्धार्थ कौलने मनदीपला बाद करून पंजाबवरील दडपण वाढवले. अखेरच्या षटकांत 11 धावांचे आव्हान पेलताना राहुलने आपली एकाग्रता पणाला लावून पंजाबला विजय मिळवून दिला. 

त्यापूर्वी, संथ सुरवातीनंतर डेव्हिड वॉर्नरने सहकाऱ्यांच्या साथीत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला केला, त्यामुळे सनरायजर्स हैदराबादने आयपीएल लढतीत दीडशेची मजल मारली. 

सुरुवातीस काहीसा चेंडू जास्त मूव्ह होत असल्याने हैदराबादने सावध पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांना पहिल्या दहा षटकांत 1 बाद 50 अशीच मजल मारता आली होती, पण त्याची भरपाई अखेरच्या दहा षटकांत करताना पहिल्या दहा षटकांच्या दुप्पट म्हणजे शंभर धावा केल्या. अर्धशतकासाठी 49 चेंडूंत घेतलेल्या वॉर्नरने त्यानंतरच्या वीस धावा तेरा चेंडूंतच केल्या, तर दीपक हुडाने तीन चेंडूंतच 14 धावा करीत पंजाब गोलंदाजांच्या जखमेवर मीठ चोळले. 

संक्षिप्त धावफलक : 
सनरायजर्स हैदराबाद ः 4 बाद 150 (डेव्हीड वॉर्नर 70 - 62 चेंडूत 6 चौकार, विजय शंकर 26, मनीष पांडे 19 - 15 चेंडूत 2 चौकार, दीपक हुडा नाबाद 14 - 3 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार, महंमद शमी 1-30, आर अश्‍विन 1-30) पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब 19.5 षटकांत 4 बाद 151 (लोकेश राहुल नाबाद 71 -53 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, मयांक अगरवाल 55 -43 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार, संदीप शर्मा 2-21)