किशोर गव्हाणे ठरला नाशिक मविप्र मॅरेथॉनचा मानकरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावतांना बुलढाणा (महाराष्ट्र)चा धावपटू किशोर गव्हाणे याने 2 तास 26.31 मिनीटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले. गतवर्षी हरीयाणाच्या करनसिंगने मॅरेथॉनमध्ये नोंदविलेला 2 तास 22.39 मिनीटांचा वेळेचा विक्रम मात्र किशोरला मोडता आला नाही. 

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी (ता.6) आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह कायम होता. सतरा गटात झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला. 

42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेची सुरवात झाली. ऑलिंम्पिकपटू ललिता बाबर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, चिटणीस डॉ.सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे यांच्यासह पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात करण्यात आली. 

पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावतांना बुलढाणा (महाराष्ट्र)चा धावपटू किशोर गव्हाणे याने 2 तास 26.31 मिनीटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले. गतवर्षी हरीयाणाच्या करनसिंगने मॅरेथॉनमध्ये नोंदविलेला 2 तास 22.39 मिनीटांचा वेळेचा विक्रम मात्र किशोरला मोडता आला नाही. 

विविध गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक देऊन सन्मानित करण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तर रावसाहेब थोरात सभागृह परीसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने रंगत वाढवली होती.

Web Title: Kishor Gavhane wins nashik marathon