शिव्या द्या; पण सामने पाहायला मैदानात या! फुटबॉल कर्णधार छेत्रीचे आर्जव 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

तुम्ही सर्वांनी मैदानात सामना पाहायला या. घरी गेल्यावरही खेळाबाबत चर्चा करा, काही करून भारतीय संघात समरस व्हा. भारतीय फुटबॉलसाठी हा महत्त्वाचा काळ आहे, भारतीय फुटबॉलला तुमची गरज आहे. 
- विराट कोहली, भारतीय क्रिकेट कर्णधार. 

मुंबई - आमच्यावर ओरडा, हवे तर शिव्याही द्या; पण आमचा खेळ पाहायला मैदानात या, असे आर्जव भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री याने केले आहे. अंधेरीतील फुटबॉल अरिनामध्ये इंटरकॉंटिनेंटल स्पर्धेत उद्या भारताचा केनियाविरुद्ध सामना होत आहे. छेत्रीचा हा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना आहे. उद्याच्या सामन्यासाठी तो मैदानात उतरल्यावर नवा इतिहास रचला जाईल. 

भारतीय फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करण्यासाठी सुनील छेत्रीला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. क्रिकेट कर्णधार विराट कोहलीनेही त्याला सपोर्ट केला आहे. आपल्या देशात फुटबॉलचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. युरोपियन फुटबॉल ते फॉलो करत असतात. त्यांचे सामने पाहत असतात तुम्ही आम्हाला हवे तर शिव्या द्या; टीका करा, परंतु कृपा करून आपल्या राष्ट्रीय संघाचे सामने पाहायला मैदानात या, अशी तळमळ छेत्रीने व्यक्त केली आहे. 

अंधेरीतील क्रीडासंकुलात तयार झालेल्या फुटबॉल एरिनामध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने तेपैईचा 5-0 असा पराभव केला. यात छेत्रीने हॅटट्रिक केली, परंतु हा सामना पाहण्यासाठी केवळ 2569 प्रेक्षक उपस्थित होते आणि तेही संघटकांनी "ब्ल्यू पिल्गिम्स' नावाने तयार केलेल्या गटातील सदस्य होते. संपूर्ण सामनाभर ते नाच-गाणी करत भारतीय संघाला प्रोत्साहित करत होते. 

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या तुलनेत भारतीय संघाचा दबदबा नसला, तरी फिफाच्या क्रमवारीत सध्या 97 व्या स्थानावर आहे. ही कामगिरीसुद्धा मोठी मानली जात आहे. 
आपल्या देशात युरोपियन क्‍लबची पॅशन आहे. त्यांचे असंख्य पाठीराखे आहेत. ज्या श्रेणीचा ते खेळ करतात, त्या तुलनेत आमची श्रेणी मागे आहे. आम्ही त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. त्यांच्या जवळही जाऊ शकत नाही हे वास्तव आहे; पण तुमचा वेळ वाया जाऊ देणार नाही, याची आम्ही खात्री देतो; त्यासाठी आमचा खेळ पाहायला मैदानात या. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी फार मोठा आहे, असे भावनिक आवाहन छेत्रीने केले आहे. 

तुम्ही सर्वांनी मैदानात सामना पाहायला या. घरी गेल्यावरही खेळाबाबत चर्चा करा, काही करून भारतीय संघात समरस व्हा. भारतीय फुटबॉलसाठी हा महत्त्वाचा काळ आहे, भारतीय फुटबॉलला तुमची गरज आहे. 
- विराट कोहली, भारतीय क्रिकेट कर्णधार. 

Web Title: Kohli backs Chhetri, urges sports fans to watch football team play in stadium