
IPL : बंगळूरचे प्ले ऑफच्या दिशेने ठाम पाऊल
हैदराबाद - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादवर ८ विकेट राखून विजय मिळवला आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफच्या दिशेने ठाम पाऊल टाकले. विराट कोहलीने (१०० धावा) २०१९नंतर आयपीएलमध्ये झळकावलेले शतक आणि त्याने फाफ ड्युप्लेसी (७१ धावा) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी केलेली १७२ धावांची भागीदारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सातव्या विजयाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबादला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादकडून बंगळूरसमोर १८७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पण फाफ ड्युप्लेसी व विराट कोहली या सलामीवीरांच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला.
दोघांनी आक्रमक फटकेबाजी केली. विराटने ६३ चेंडूंमध्ये १२ चौकार व ८ षटकारांसह १०० धावांची खेळी साकारली. ड्युप्लेसीने ७ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. बंगळूरने अवघे २ विकेट गमावत विजयी लक्ष्य ओलांडले.
दरम्यान, याआधी बंगळूरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मायकेल ब्रेसवेल याने अभिषेक शर्मा (११ धावा) व राहुल त्रिपाठी (१५ धावा) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवून संघ व्यवस्थापन व कर्णधाराचा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय सार्थ ठरवला. कर्णधार एडन मार्करम व हेनरीक क्लासेन या जोडीने ७६ धावांची भागीदारी करताना हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप खेळताना मार्करम १८ धावांवर त्रिफळाचीत झाला. मार्करम बाद झाल्यानंतर क्लासेन व हॅरी ब्रुक या परदेशी जोडीने ७४ धावांची भागीदारी करताना हैदराबादच्या धावसंख्येत मोलाची भर टाकली. क्लासेन याने ५१ चेंडूंमध्ये १०४ धावांची खेळी साकारली. त्याने शतकी खेळीत ८ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली.
यंदाच्या मोसमात शतकी खेळी करणारा तो हॅरी ब्रुकनंतरचा दुसरा परदेशी खेळाडू ठरला. या दोन परदेशी खेळाडूंसह विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर व प्रभसिमरन सिंग या भारतीय खेळाडूंनी शतके झळकाविली आहेत.
हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर क्लासेन बाद झाला. ब्रुकने नाबाद २७ धावांची खेळी केली. हैदराबादने २० षटकांत ५ बाद १८६ धावा फटकावल्या. बंगळूरकडून मायकेल ब्रेसवेल याने १३ धावा देत २ फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक - सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत ५ बाद १८६ धावा (हेनरीक क्लासेन १०४ - ५१ चेंडू, ८ चौकार, ६ षटकार, हॅरी ब्रुक नाबाद २७, मायकेल ब्रेसवेल २/१३) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १९.२ षटकांत २ बाद १८७ धावा (विराट कोहली १०० - ६३ चेंडू, १२ चौकार, ४ षटकार, फाफ ड्युप्लेसी ७१).