कोल्हापूर दोन्ही गटांतून उपांत्य फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

मंचर : राज्य कबड्डी संघटनेच्या किशोर गटाच्या 28व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरने किशोर-किशोरी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या मुंबई उपनगरचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले. पुण्याच्या मुलींनी उपांत्य फेरी गाठली. मुलांना मात्र अपयश आले. 

मंचर : राज्य कबड्डी संघटनेच्या किशोर गटाच्या 28व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरने किशोर-किशोरी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या मुंबई उपनगरचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले. पुण्याच्या मुलींनी उपांत्य फेरी गाठली. मुलांना मात्र अपयश आले. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सांगलीने चुरशीच्या झुंजीज बीडचा प्रतिकार 34-33 असा एका गुणाने मोडून काढला. विश्रांतीला सांगलीकडे 18-15 अशी आघाडी होती. मात्र, त्यानंतर सामना सातत्याने दोन्ही बाजूंकडे झुकत होता. अगदी अखेरच्या टप्प्याच वैभव जाधव आणि अनिकेत बल्लारी यांच्या वेगवान खेळाने सांगलीने एका गुणाने बाजी मारली. बीडच्या सचिन सातपुते आणि अशोक शिंदे यांचा खेळ पराभवातही लक्षवेधक ठरला. अन्य एका लढतीत परभणीने सोलापूरचे आव्हान 54-15 असे सहज संपुष्टात आणले. सुरवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखणाऱ्या परभणीने मंध्यतरालाच 25-11 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल जवळपास निश्‍चित केला होता. '=

यजमान पुण्याच्या मुलांना कोल्हापूरकडून पराभव पत्करावा लागला. कोल्हापूरने त्यांचा प्रतिकार 35-29 असा मोडून काढला. मध्यंतराला 21-13 अशी मोठी आघाडी मिळविल्यानंतर उत्तरार्धात कोल्हापूरने सावध खेळ करून विजय निसटणार याचीच काळजी घेतली. मंगेश सुवासे, विनायक कांबळे आणि किरण जोशीलकर यांचा चतुरस्र खेळ निर्णायक ठरला. ठाण्याने नंदुरबारचा 48-27 असा पराभव केला. महेश भोईर आणि शक्तिसिंग यादव यांचा खेळ उल्लेखनीय ठरला. 

मुलींच्या गटात मुंबई शहरने सोलापूरचा कडवा प्रतिकार 37-18 असा परतवून लावला. नियोजनबद्ध खेळणाऱ्या मुंबई शहरच्या खेळाडूंनी पूर्वार्धात मिळविलेली 18-15 ही आघाडी निसटणार, नाही याची काळजी घेतली. मुंबईवर लोण बसण्याची वेळ असताना दोन खेळाडूंत त्यांनी सोलापूरच्या चढाईपटूची पकड घेतली. सामन्याला कलाटणी देणारा हाच क्षण ठरला. प्रीती हांडे, सुप्रिया पाल, ज्योती डपळे यांचा मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा होता. सोलापूरच्या तृप्ती अंधारे, स्वाती कोंडवाल. मेघा गवळी यांचे प्रयत्न अपुरे पडले. राधा मोरे, पायल वसावे यांच्या झंझावती चढाया, सिद्धी पोळ आणि स्वप्नाली पासलकर यांचा भक्कम बचाव या जोरावर पुणे संघाने रत्नागिरीचा 62-12 असा धुव्वा उडवला. अन्य लढतीत गोपिका शेळके, रसिका चिखले यांच्या जोरदार खेळाने कोल्हापूरने गतविजेत्या मुंबई उपनगरचे आव्हान 46-37 असे मोडून काढले. अखेरच्या उपांत्यपूर्व लढतीत पालघरने लातूरचा 48-34 असा पराभव केला. त्यांनी विश्रांतीला मिळविलेली 34-9 अशी मोठी आघाडी निर्णायक ठरली. उत्तरार्धात त्यांनी जरूर प्रयत्न केले, पण त्यांनी पिछाडी पूर्णपणे भरून काढता आली नाही. 

अशा होतील उपांत्य लढती 
मुले ः परभणी वि. सांगली 
ठाणे वि. कोल्हापूर 
मुली ः पुणे वि. मुंबई शहर 
पालघर वि. कोल्हापूर 

Web Title: kolhapur in kabaddi semi final