युनायटेड वॉरिअर्सची हसं क्‍लबवर मात 

युनायटेड वॉरिअर्सची हसं क्‍लबवर मात 

कोल्हापूर - पंजाबच्या युनायटेड वॉरिअर्स क्‍लबने दिल्लीच्या हंस वुमेन्स फुटबॉल क्‍लब, तर पश्‍चिम बंगालच्या चांदणी स्पोर्टिंग क्‍लबने साई वुमेन्स फुटबॉल क्‍लबवर प्रत्येकी 3-0ने विजयाची नोंद केली. मणीपूरच्या क्रिप्सा स्पोर्टसने महाराष्ट्राच्या इंडिया रश सॉकरवर 4-0ने मात केली. इंडियन वुमेन्स लीगची पात्रता फेरी छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. केएसएतर्फे त्याचे आयोजन केले आहे. 

युनायटेड वॉरिअर्स विरूद्ध हंस क्‍लब यांच्यात सकाळी आठ वाजता सामन्यास सुरवात झाली. हंसकडून पहिला स्वयंगोल झाल्यानंतर युनायटेडने दुसऱ्या गोलसाठी इर्षेने खेळ सुरू केला. एक गोलचे ओझे झाल्याने गोलची परतफेड करण्यासाठी हंसकडून भाग्यश्री दळवी, तन्वी सिंग, सावी मेहता यांनी बचावफळी भक्कम ठेवत पुढच्या फळीतील खेळाडूंना पास देण्यावर भर दिला. युनायटेडच्या मध्य फळीतील मनप्रीत कौर, लाको भुतिया, सलमादेवी यांनी हंसच्या चढायांना दाद न देता खेळ केला. या वेळेत युनायटेडकडून अनिता रावने 30, तर अंजू तमंगने 34 व्या मिनिटाला गोल करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात हंस क्‍लबने जोरदार प्रतिकार करत चढाया केल्या; मात्र त्यांना युनायटेडची बचावफळी भेदता आली नाही. युनायटेडच्या अंजू तमंगने उत्कृष्ट खेळ केला; मात्र तिच्या फटक्‍यांचे रूपांतर गोलमध्ये झाले नाही. तिलाच सामनावीरचा मान मिळाला. 

दुसऱ्या सामन्यात चांदणी क्‍लबच्या गीता दास, देबेंता रॉय, रिम्पा बरूई, संगीता बसफोरे यांनी सुरवातीपासूनच आक्रमक चढाया केल्या. साई वुमेन्सच्या खेळाडूंनी या चढाया हाणून पाडत पुढच्या फळीतून चांदणीच्या गोलक्षेत्रात सातत्याने मुसंडी मारली. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला चांदणीकडून रिम्पा बरूईने पहिला गोल केल्यानंतर साई वुमेन्सच्या खेळाडूंवर दडपण आले. उत्तरार्धात साई वुमेन्सच्या गोलरक्षक ममता कुमारीने चांदणी क्‍लबच्या खेळाडूंनी लगावलेले फटके अडवून संघावर गोल होणार नाहीत, याची पूरेपूर दक्षता घेतली. त्यांच्या बचावफळीतील खेळाडू आशाकुमारी, पुष्पाकुमारी, अनामिका यांनी चांदणी खेळाडूंच्या चढायांना लगाम लावला.

चांदणी क्‍लबच्या सुमित्रा मरांडीने नजाकतभरा खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले. या वेळेत संगीता बसफोरेला 83 व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. त्यानंतर संगीतानेच 87 व्या मिनटिाला गोल करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती राहिली. सुमित्रा मरांडी सामनावीर ठरली. 

मणीपूरचा क्रिप्सा स्पोर्टस विरूद्ध इंडिया रश सॉकर यांच्यातील सामन्यात क्रिप्साच्या खेळाडूंचे कौशल्य पाहण्यास प्रेक्षक दुपारी साडे तीनपूर्वीच मैदानात हजर होते. क्रिप्साकडून रंजना चानूने 15 व्या मिनिटाला रश सॉकरच्या गोलक्षेत्रातून मारलेला चेंडू थेट गोलजाळीत शिरला. या गोलने क्रिप्साने 1-0ने आघाडी घेतली. रश सॉकरकडून निशा, शारदा, रवीना यादव यांनी क्रिप्साच्या चढाया रोखण्यासाठी जीवाचे रान केले. क्रिप्साच्या खेळाडूंचे शॉर्ट पास, चेंडूवर अचूक नियंत्रण अप्रतिम होते. या वेळेत एका वेगवान चढाईत क्रिप्साच्या चानूच्या पासवर रतनबाला देवीने 26 व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करत प्रेक्षकांची मने जिंकली.

उत्तरार्धात क्रिप्साच्या कर्णधार दंगमी ग्रेसने 64 व्या मिनिटाला गोल करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. या वेळेत रश सॉकरच्या खेळाडूंनी क्रिप्साच्या चढाया रोखून जोरदार प्रतिचढाया केल्या. क्रिप्साच्या बचावफळीतील आशालता देवी, आशाराणी देवी, असीम रोमी देवी यांनी या चढाया रोखल्याने गोलच्या संधी हुकल्या. क्रिप्साच्या रतनबाला देवीने 82 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

सामनावीर असे : 
- अंजू तमंग (युनायटेड वॉरिअर्स स्पोर्टिंग, पंजाब) 
- सुमित्रा मरांडी (चांदणी स्पोर्टिंग क्‍लब, पश्‍चिम बंगाल) 
- आशाराणी देवी (क्रिप्सा स्पोर्टस, मणीपूर) 

उद्याचे सामने 
रायझिंग स्टुडंट क्‍लब (ओडिशा) विरूद्ध इंदिरा गांधी ऍकॅडमी फॉर स्पोर्टस (पुदुच्चेरी), वेळ - दुपारी 12 : 00 
बडोदा फुटबॉल ऍकॅडमी विरूद्ध जे. अँड के. स्पोर्टस कौन्सिल (जम्मू आणि काश्‍मीर), वेळ - दुपारी 3 : 30 

एआयएफएफच्या "फेसबूक'वर लाईव्ह प्रक्षेपण 
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (एआयएफएफ) फेसबूक पेजवर सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. सायंकाळी सहापर्यंत सुमारे सहा हजार प्रेक्षकांनी ऑनलाईन सामने पाहण्याचा आनंद लुटल्याचे केएसएतर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com