कृष्णकुमार ‘जनसुराज्य शक्ती’

कृष्णकुमार ‘जनसुराज्य शक्ती’

वारणानगर - येथे  झालेल्या वारणा कुस्ती श्री महासंग्राम राष्ट्रीय कुस्ती मैदानातील लाखो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाची जनसुराज्य शक्ती श्री किताबाची कुस्ती हिंदकेसरी, भारतकेसरी कृष्णकुमार व पंजाबचा भारत केसरी जास्सा पट्टी यांच्यातील कुस्ती निर्धारित वेळेत न झाल्याने गुणावर झाली. त्यामध्ये पाच मिनिटांत कृष्णकुमारने दोन गुण मिळवित जनसुराज्य शक्ती किताब पटकाविला.

दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या वारणा साखर शक्ती किताब भारत केसरी साबाने, तात्यासाहेब कोरे दूध- वाहतूक शक्ती राष्ट्रीय विजेता अजय गुज्जरने, वारणा दूध संघ शक्ती किताब माऊली जमदाडेने, वारणा ट्रॅक्‍टर ऊस वाहतूक संस्था शक्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटेने, वारणा सहकारी बॅंक शक्ती किताब हरियाणा केसरी प्रवीण भोलाने जिंकत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली.

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह आयोजित व भारतीय कुस्ती संघ, राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या तेविसाव्या पुण्यस्मरणार्थ निकाली कुस्त्यांचा ‘वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम’ लाखो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत झाला.

बुधवारी दुपारी एक वाजता युवा नेते विश्‍वेश कोरे यांच्या हस्ते कुस्त्यांना प्रारंभ झाला. या मैदानात दुपारपासून १५ किताबाच्या कुस्त्यांसह पुरस्कृत २५ लढती, तसेच ३० किलो ते ९६ किलो वजन गटातील २७५ कुस्त्या, अशा एकूण ३१५ कुस्त्या मैदानात झाल्या.  

अशा झाल्या लढती 
जनसुराज्य शक्ती किताब - ‘जनसुराज्यशक्ती किताबाच्या प्रथम क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पिद्दी आखाड्याचा हिंदकेसरी जास्सा पट्टी सोनीपतच्या भारतकेसरी कृष्णकुमारवर सुरुवातीला ताबा मिळविला; पण चपळाईने कृष्णकुमारने धुडकाविला. त्यानंतर मात्र कृष्णकुमारने सावध पवित्रा घते ढाक, घिस्सा, एकेरी पटाची, हप्ता मारण्याचा प्रयत्न केले; पण जास्साने सर्व डाव धुडकावून लावले. यानंतर दोघांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत वेळकाढू धोरण अवलंबले. अकराव्या मिनिटानंतर कृष्णकुमारने एकेरी आणि घिस्सा डावावर जास्साला चितपट करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा जास्सा पट्टी बचावला. पंधरा मिनिटे झाल्यानंतर साबाने धोबी डावाची पकड घेतली; पण कृष्णकुमारने बचाव केला. तीस मिनिटानंतर गुणांवर कुस्ती करण्याचा निर्णय झाला. पाच मिनिटांत कृष्णकुमारने दोन गुण मिळविल्याने जनसुराज्य शक्ती केसरी किताबाचा मानकरी ठरला.

वारणा साखर कारखाना शक्ती - भारत केसरी साबा (पंजाब) व हिंदकेसरी जोगींदरसिंह (चांदरूप आखाडा) यांच्यातील वारणा साखर कारखाना शक्तीसाठी झालेल्या लढतीततही सुरुवातीला दोघांनीही एकमेकांचा अंदाज घेण्यास काही मिनिटे घालविली. पाचव्या मिनिटाला जोगिंदरसिंहने टांग लावण्याचा प्रयत्न केला. पुन्हा दहा मिनिटानंतरही एकमेकांचा अंदाज घेणे, खडाखडी आणि एकमेकाचे डाव मोडीत काढण्यात त्यांनी वेळ घालविला. वीस मिनिटानंतर दोन्ही मल्लांना निकाली कुस्ती करण्याच्या सूचना दिल्या; पण त्यानंतरही खडाखडी झाल्याने गुणांवर कुस्ती घेण्याचा निर्णय झाला. यासाठी पाच मिनिटे वेळ देण्यात आला आणि साबाने केवळ एका मिनिटातच एकछाक डावावर जोगिंदरसिंहला अस्मान दाखविले. साबाला वारणा साखर किताब विश्‍वेश कोरे, जोतिरादित्य कोरे, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, विजयकुमार कोले यांच्यासह संचालकांच्या हस्ते देण्यात आला.

तात्यासाहेब कोरे दूध- वाहतूक शक्ती - तात्यासाहेब कोरे दूध-वाहतूक शक्तीसाठी काका पवार तालमीचा राष्ट्रीय विजेता किरण भगत आणि राष्ट्रीय विजेता अजय गुज्जर (दिल्ली) यांच्यातील लढत प्रेक्षणीय झाली. पहिल्याच मिनिटाला भगतने बाहेरून आकडी लावत ताबा मिळविला. ही लढत पाचव्या मिनिटाला मैदानाच्या बाहेर गेल्याने मैदानात दोघांना घेऊन सूचना दिल्या. अजय गुजरने सहाव्या मिनिटाला अचानक समोरून किरणला हप्ता मारत चितपट केले. अजयला तात्यासाहेब कोरे वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह संचालकांच्या हस्ते किताब देऊन सन्मानित 
करण्यात आले.  

वारणा दूध संघ शक्ती - वारणा दूध संघ शक्तीसाठी कोल्हापूर येथील शाहू विजयी गंगावेश तालमीचा भगवंत केसरी माऊली जमदाडेशी उत्तरप्रदेश केसरी गोपाल यादवशी लढत झाली. सुरुवातीलाच गोपालचा एकेरी पट काढून जमदाडेला चितपट करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्या मिनिटाला माउलीने गोपालवर ताबा मिळविला. त्यानंतर गोपालने चपळाईने डंका डाव लावण्याचा केलेला प्रयत्न माउलीने उधळून लावला. पुन्हा माउलीने घुटना डाव, नवंदर काढीत घिस्सा डावाने तेराव्या मिनिटाला भगतला चितपट केले. त्याला वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांच्यासह संचालकांच्या हस्ते गौरवण्यात आले.

वारणा ट्रॅक्‍टर ऊस वाहतूक संस्था शक्ती - वारणा ट्रॅक्‍टर ऊस वाहतूक संस्था शक्तीसाठी कोल्हापुरातील शाहू कुस्ती केंद्राचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याची कर्नाटक केसरी कार्तिक काटे (कर्नाटक) यांच्यात लढत झाली. सुरुवातीला खडाखडी झाल्यानंतर आठव्या मिनिटाला कार्तिकने चपळाईने समाधानवर ताबा मिळविला. बाविसाव्या मिनिटाला समाधान घोडके जखमी झाल्याने कार्तिक काटेला विजयी घोषित करण्यात आले.  

वारणा सह.बॅंक शक्ती - वारणा सह. बॅंक शक्तीसाठी उपभारत केसरीसाठी झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या न्यू मोतीबागच्या बाला रफीक व हरियाणा केसरी प्रवीण भोला (चांदरूप आखाडा) यांच्यात झाली. दहाव्या मिनिटापर्यंत दोन्हीही मल्लांनी डाव-प्रतिडाव केला. पंचांनी सूचना दिल्यानंतर दोघेही आक्रमक प्रवीण भोला आक्रमक झाला. पंधराव्या मिनिटाला रफिकने घुटना डाव करण्याचा प्रयत्न करताच भोलाने चपळाईने ताबा घेतला. विसाव्या मिनिटाला दोघेही आक्रमक झाल्यानंतर भोलाने बाहेरून आकडी लावून रफीकला चितपट केले. त्यांना युवा नेते विश्‍वेश कोरे, उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी गौरवले.

ईडीएफ मान इंडिया शक्ती - ईडीएफ मान इंडिया शक्तीसाठी झालेल्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार (राष्ट्रकुल कुस्ती केंद्र)वर काका पवार तालमीच्या राष्ट्रीय विजेता शिवराज राक्षेने सुरुवातीपासूनच ताबा मिळविला. राक्षे मल्लाने ताकद आणि डावांच्या चलाखीने पाच मिनिटांतच निकाल डावावर नंदूला अस्मान दाखविले.

तात्यासाहेब कोरे शेतीपूरक शक्ती - तात्यासाहेब कोरे शेतीपूरक शक्तीसाठी राष्ट्रीय विजेता कौतुक डाफळे (काका पवार तालीम सांगली) विरुद्ध राष्ट्रीय विजेता लवप्रित (खन्ना आखाडा) यांच्यातील लढत दहा मिनिटे सुरू होती. कौतुकने सुरुवातीपासून कौतुकने एक लांगी, घुटना असे डाव करीत चितपट करण्याचा प्रयत्न करीत होता; पण लवप्रित हटला नाही. यामुळे दमलेल्या कौतुकला लवप्रितने ताबा मिळविला. वीस मिनिटानंतर कुस्ती शौकिनांनी अक्षरशः उभे राहून या कुस्तीचा आस्वाद घेतला; पण झालेल्या लढतीत कौतुक जखमी झाल्याने लवप्रितला विजयी घोषित करण्यात आले. आर. वाय. खोत, संचालक हिंदूराव तेली, प्रकाश मोरे, आर. बी. कुंभार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

वारणा बिल्ट्यूब इंडस्ट्रिज - शक्ती वारणा बिल्ट्यूब इंडस्ट्रिज शक्तीसाठी महाराष्ट्र चॅम्पियन योगेश बोंबाळे (गंगावेश, कोल्हापूर) विरुद्ध राष्ट्रीय विजेता विलास डोईफोडे (गोकुळ वस्ताद, कोल्हापूर) यांच्यातील कुस्ती सुरुवातीपासून एकमेकांचे अंदाज घेण्यात बराच वेळ गेल्यानंतर दहाव्या मिनिटाला विलास डोईफोडेने मोळी डावावर योगेशला चितपट केले. 
वारणा विभाग शिक्षण मंडळ शक्ती वारणा विभाग शिक्षण मंडळ शक्तीसाठी राष्ट्रीय विजेता गणेश जगताप (काका पवार, तालीम सांगली)विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष दोरवड (शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्यात झालेली लढत कंटाळवाणी झाली. अखेर पंचांनी ही कुस्ती गुणावर घेण्याचा निर्णय घेतला आणि काही क्षणातच दोरवडने गुण घेतला आणि विजय साकारला.

वारणा दूध कामगार संघटना शक्ती - वारणा दूध कामगार संघटना शक्तीसाठी उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील (शाहू कुस्ती केंद्र, कोल्हापूर)  विरुद्ध राष्ट्रीय विजेता विष्णू खोसे (सह्याद्री कुस्ती संकुलन) यांच्यात झाली. ही कुस्तीही प्रेक्षणीय झाली, अकराव्या मिनिटाला शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा राहिलेल्या या कुस्तीत विष्णू खोसेने घुटना डावावर जिंकली.
कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती शक्तीसाठी राष्ट्रीय विजेता सचिन जामदार व राष्ट्रीय विजेता अंकीत कुमार (सोनिपत) यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत सचिन जामदारने एकेरी कस काढून सोनिपतच्या अंकितकुमारला पराभूत केले.  

वारणा बझार शक्ती - वारणा बझार शक्तीसाठी महाराष्ट्र चॅम्पियन शिवाजी पाटील (मोतीबाग, कोल्हापूर) विरुद्ध राष्ट्रीय विजेता अशोक कुमार (सोनिपत) यांच्यात काटा लढत झाली. शिवाजी पाटील सुरुवातीपासून वर्चस्व मिळवित पाचव्या मिनिटाला चपळाईने घुटना डावावर विजयी झाला. 
वारणा कामगार शक्ती ः वारणा कामगार शक्तीसाठी राष्ट्रीय विजेता विक्रम वडतिल (महाराष्ट्र पोलिस) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन दत्ता नरळे (गंगावेश कोल्हापूर) यांच्यात झालेली कुस्ती दत्ता नरळेने वडतिलला चितपट केले.

वारणा गणेश मंडळ शक्ती - वारणा गणेश मंडळ शक्तीसाठी महाराष्ट्र चॅम्पियन नाना ठोंबरे (वारणा आखाडा) विरुद्ध राष्ट्रीय विजेता मनोजकुमार (सोनिपत) यांच्यात झाली. नाना ठोंबरेने एकलांगी डावावर सोनिपतच्या मनोजकुमारला चितपट केले.
विनय कोरे यांचा सत्कार

वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांनी वारणेत कुस्तीचे मैदान आयोजित केल्यामुळे त्यांचा सत्कार महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर यांनी केला. महाराष्ट्र जे कुस्ती मैदान आयोजित करतात, तिथे जाऊन रावसाहेब मगर संयोजकांचा सत्कार करतात.
डॉ. विनय कोरे यांना मानपत्र

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने डॉ. विनय कोरे यांना राष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करून मल्लांना प्रोत्साहन दिल्याबद्दल अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. 

महाराष्ट्र चॅम्पियन शिवाजीराव साळुंखे (करंजवडे ता. वाळवा) यांना तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्कार वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com