कोल्हापूर, रेल्वे, छत्तीसगड, आंध्र, महाराष्ट्राची घोडदौड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

इचलकरंजी - येथे सुरू असलेल्या ५१ व्या राष्ट्रीय सिनियर खो-खो स्पर्धेत शनिवारी झालेल्या बाद फेरीमध्ये कोल्हापूर, रेल्वे, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या पुरुष गटातील संघांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली. तर महिला गट महाराष्ट्र, एअरपोर्ट ॲथॉरिटी या संघांनी विजय संपादन केला.

इचलकरंजी - येथे सुरू असलेल्या ५१ व्या राष्ट्रीय सिनियर खो-खो स्पर्धेत शनिवारी झालेल्या बाद फेरीमध्ये कोल्हापूर, रेल्वे, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या पुरुष गटातील संघांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली. तर महिला गट महाराष्ट्र, एअरपोर्ट ॲथॉरिटी या संघांनी विजय संपादन केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज क्रीडानगरीत सुरू असलेल्या स्पर्धेत तीन दिवसांच्या साखळी फेरीनंतर शनिवारपासून बाद फेरीतील सामने खेळले गेले. पुरुष गटात पहिली लढत रेल्वे विरुद्ध ओरिसा यांच्यात झाली. हा सामना रेल्वेने १ डाव १० गुणांनी जिंकला. त्यामध्ये रंजन शेट्टी याने १ मि. २० सेकंद संरक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाचे ६ गडी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.

छत्तीसगड विरुद्ध मध्यभारत यांच्यातील सामना छत्तीसगडने २ गुण व ४ मिनिटे राखून जिंकला. गुजरात विरुद्ध कर्नाटक यांच्यातील लढतीत कर्नाटकाने १ डाव ७ गुणांनी गुजरातचा पराभव केला. आंध्रप्रदेश विरुद्ध तेलंगणा यांच्यातील सामना आंध्रप्रदेशने अवघ्या तीन गुणांनी जिंकला. महाराष्ट्र विरुद्ध एअरपोर्ट ॲथॉरिटी यांच्यात चुरशीची लढत झाली. ही लढत २ गुणांसह ५ मिनिटे राखत महाराष्ट्राने जिंकली. महाराष्ट्राच्या हर्षत हतगणकर, नरेश सावंत, सूरज लांडे यांचा विजयात मोलाचा वाटा ठरला. तर एअरपोर्टच्या बाळासाहेब पोकार्डे, मुनीर बाशा यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

मध्यंतरापर्यंत ६ विरुद्ध ९ अशी गुणसंख्या होती. त्यानंतर महाराष्ट्राने एकतर्फी वर्चस्व राखत हा सामना जिंकला. केरळ विरुद्ध पश्‍चिम बंगाल हा सामना एकतर्फी होऊन केरळ १२ गुणांनी विजय प्राप्त केला. कोल्हापूर विरुद्ध तामिळनाडू लढतीत कोल्हापूरने प्रारंभापासून अखेरपर्यंत वर्चस्व राखले. नाणेफेक हरल्यानंतरही कोल्हापूर संघाने पहिल्या सत्रात प्रतिस्पर्ध्यांचे ११ गडी टिपले. त्यामध्ये नीलेश पाटील व अभिजित पाटील यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले.

कोल्हापूरच्या सागर पोतदारसह नीलेश व अभिजित पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या डावातही कोल्हापूरने वर्चस्व राखताना आक्रमक खेळी करत पुन्हा ११ गडी टिपले. विक्रम पाटील, सुशांत कलढोणे यांच्यासह सागर व अभिजित यांनी दमदार कामगिरी करत प्रत्येकी २ बळी टिपले. विजयासाठी १६ गुणांची गरज असताना तामिळनाडूला अवघ्या ४ गुणांवर समाधान मानावे लागले. विदर्भ विरुद्ध पॉण्डेचरी यांच्यात विदर्भाने ३ गुणांनी विजय प्राप्त केला.

महिला गटात महाराष्ट्र विजयी
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने आंध्रप्रदेश संघाला १ डाव व ११ गुणांनी हरवले. एअरपोर्ट आथॉरिटी विरुध्द पंजाब यांच्यात एअरपोर्ट ॲथॉरिटीने १ डाव ७ गुणांनी सामना जिंकला. तेलंगणा आणि दिल्ली यांच्यात अटीतटीच्या झालेल्या सामन्यात दिल्लीने २ गुणांनी विजय मिळविला. केरळने विदर्भावर एकतर्फी मात करीत एक डाव ५ गुणांनी विजय मिळविले. गुजरातवर ओरिसाने १ गुणाने तर पश्‍चिम बंगालने तामिळनाडूवर १ विजय मिळविले. कोल्हापूरने उत्तर प्रदेशवर एकतर्फी मात करीत एक डाव ८ गुणांनी विजय मिळविला.

Web Title: Kolhapur News National Kho-Kho competition