प्रोफेशनल, एम.डब्ल्यू.जी., स्नॅपची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कोल्हापूर - चौकार-षटकारांच्या आतषबाजीत सकाळ - रोटरी प्रीमियर लीग चषक क्रिकेट स्पर्धेस आज सुरुवात झाली. अखेरच्या षटकांत २३ धावांची गरज असताना प्रोफेशनल सुपर चॅलेंजर्सच्या मयूर पटेलची तडाखेबाज खेळी व एम.डब्ल्यू.जी. सुपरकिंग्जच्या सूरज रायगांधीने केलेली संयमी फलंदाजी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

कोल्हापूर - चौकार-षटकारांच्या आतषबाजीत सकाळ - रोटरी प्रीमियर लीग चषक क्रिकेट स्पर्धेस आज सुरुवात झाली. अखेरच्या षटकांत २३ धावांची गरज असताना प्रोफेशनल सुपर चॅलेंजर्सच्या मयूर पटेलची तडाखेबाज खेळी व एम.डब्ल्यू.जी. सुपरकिंग्जच्या सूरज रायगांधीने केलेली संयमी फलंदाजी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

दोघांनी संघाचे विजय साकारत आजचा दिवस गाजविला. स्नॅप स्पेक्‍ट्रमचा कर्णधार शैलेश भोसलेने २० चेंडूंत अर्धशतक झळकावत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने २४ चेंडूंत नाबाद ६३ धावांची खेळी केली. सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित सकाळ - रोटरी प्रीमिअर लीग चषक क्रिकेट स्पर्धेस मेरीवेदर मैदानावर आज सुरुवात झाली. ऋतुराज पाटील फाऊंडेशन स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. हॉटेल सिट्रस हॉस्पिटॅलिटी व डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय हे कॅप्स पार्टनर आहे. रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर आहेत. 

स्नॅपची स्पेक्‍ट्रमची पास्ट रोट्रॅक्‍टर्सवर सहा धावांनी मात
स्नॅप स्पेक्‍ट्रमने १० षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ११७ धावा केल्या. सलामीचे फलंदाज संजय कदम सहा, राजेश आडके चार, गिरीश बारटक्के शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शैलेश भोसले व रवी मायदेव यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत उत्कृष्ट फलंदाजी केली. शैलेशने सहा षटकार, तीन चौकारांच्या साह्याने नाबाद ६३ धावा फटकाविल्या. रवीने २१ चेंडूंत २३, तर मंजूनाथ सवन्नावरने चार चेंडूंत सात धावा केल्या. पास्ट रोट्रॅक्‍टर्सकडून अमित दड्डीकरने दोन, तर नीलेश मुळे व राजीव करूरने प्रत्येकी एक गडी बाद केला. पास्ट रोट्रॅक्‍टर्सने १० षटकांत दोन गडी गमावून १११ धावा फटकाविल्या. सचिन देशमुखने १८ चेंडूंत २७, तर अजित मडकेने नाबाद ५२ धावा ठोकल्या. त्याने २७ चेंडूंत या धावा करताना पाच चौकार व एक षटकार ठोकला. सचिन व अजितने ६६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अमित दड्डीकरने १२ चेंडूंत १६ धावा केल्या. अखेरच्या षटकात विजय दृष्टिपथात आला होता. त्यांना चार चेंडूंत तेरा धावांची आवश्‍यकता होती. मात्र स्नॅप स्पेक्‍ट्रमच्या गोलंदाजाने टिच्चून गोलंदाजी केली. स्नॅप स्पेक्‍ट्रमकडून संजय कदम व रवी मायदेव प्रत्येकी एक गडी बाद केला.

सूरजच्या ‘सुपर पॉवर’ने एम.डब्ल्यू.जी. विजयी
बेेलगाम ट्रेड सेटर्सने १० षटकांत नऊ गडी गमावून ८० धावा केल्या. राहुल कुलकर्णीने १० धावा केल्या. संग्राम सरनोबतने १६ चेंडूंत ३२, तर रवींद्र पवारने १३ चेंडूंत १८ धावा फटकावल्या. एम. डब्ल्यू. जी. सुपरकिंग्जकडून मंदार पाटील, निवास वाघमारे व दाजिबा पाटील यांनी प्रत्येकी दोन, तर रोहन सावंत व समीर कोतवालने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एम.डब्ल्यू.जी. सुपरकिंग्जने ९ षटके ५ चेंडूंत पाच गडी गमावून ८२ धावा फटकावून सामना जिंकला. सलामीचे फलंदाज नील पंडित-बावडेकर व सूरज रायगांधी यांनी संघास झकास सुरुवात करून दिली. नील पंडित-बावडेकर १८ चेंडूंत २१ धावा फटकावून निवृत्त झाले. सूरज रायगांधीने २६ चेंडूंत नाबाद ३४ धावा फटकावत संघाचा विजय सूकर केला. अखेरच्या षटकात संघास दोन चेंडूंत तीन धावा हव्या असताना त्याने चौकार ठोकून विजय साजरा केला. निवास वाघमारेला १३ चेंडूंत १७ धावा करता आल्या. समीर कोतवाल, दाजिबा पाटील व मंदार पाटील धावबाद झाले. बेलगाम ट्रेड सेटर्सकडून रवींद्र पवारने एक गडी बाद केला. 

मयूरच्या तडाखेबाज फलंदाजीने ‘प्रोफेशनल’ची जीत
मार्व्हलस सुपर रेंजर्सने १० षटकांत ११७ धावांचे आव्हान प्रोफेशनल चॅलेंजर्ससमोर ठेवले. त्यांच्या रविराज शिंदेने ३४ चेंडूंत ६७ धावा फटकाविल्या. त्याने दोन षटकार, तर आठ चौकार ठोकले. राजेश रेड्डीजने १३, स्वप्नील कांबळे ८, तर सचिन गाडगीळने नऊ चेंडूंत २८ धावा फटकावल्या. प्रोफेशनल चॅलेंजर्सकडून अनिल देशमुख, सरगम फलारे व राजेश केसरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल प्रोफेशनल चॅलेंजर्सने अखेरच्या षटकात सामना जिंकून प्रेक्षकांना धक्का दिला. सहा चेंडूंत २३ धावांची आवश्‍यकता असताना त्यांच्या मयूर पटेलने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने नऊ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या. राजेश केसरेने आठ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या फलंदाजीमुळे ११७ धावांचे अवघड आव्हान प्रोफेशनल चॅलेंजर्सने सहज पार केले. तत्पूर्वी त्यांच्या सचिन परांजपेने ३४, सरगम फलारेने १४ धावा केल्या होत्या. अन्य फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मार्व्हलसकडून नामदेव गुरवने तीन, तर स्वप्नील कांबळे व रविराज शिंदे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

महापौर स्वाती यवलुजे, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, रोटरी डिस्ट्रिक्‍ट ३१७०चे गव्हर्नर आनंद कुलकर्णी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संग्राम शेवरे, सेक्रेटरी जिया मोमीन, इव्हेंट चेअरमन आर. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. 

या वेळी मुख्य संपादक पवार यांनी सकाळ व रोटरीचे क्रिकेटच्या माध्यमातून ऋणानुबंध घट्ट झाले असल्याचे सांगितले. सौ. यवलुजे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या; तर तेजस्विनी सावंत यांनी तिरंग्यासाठी एकदा तरी आयुष्यात चांगले काम करा, असे आवाहन केले. श्री. कुलकर्णी यांनी रोटरी खेळाद्वारे प्रेमाचा संदेश देत असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी सुरजित पवार, प्राचार्य महादेव नरके, किरण पाटील, संजीव परीख, अतुल पाटील, शरद पाटील, नगरसेवक राजाराम गायकवाड, गौतम परमार, संग्राम पाटील, अजय कुलकर्णी, सागर नालंग, मोहन मुल्हेरकर, राजश्री कुलकर्णी, हेमांग शहा, राजेश आडके, आर. जे. शीतल, डॉ. भारत खराटे, अभय बिचकर, दिलीप शेवाळे, डॉ. अशोक जाधव, संदीप साळोखे, समीर कुलकर्णी, दीपक बोगार, डॉ. सुहास शहा, विजय रेळेकर, सूर्यकांत पाटील-बुदीहाळकर, अभिजित भोसले, डॉ. भूषण शेंडगे, मनोज मुनीश्‍वर, अमित दड्डीकर, अनिकेत अष्टेकर उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News RPL Cricket competition