INDvsSA : तिसऱ्या कसोटीत ईशांत शर्मा बाहेर तर कुलदीपला संधी?

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

रांचीच्या खेळपट्टीचा अंदाज घेता भारतीय संघाचा कप्तान तिसरा फिरकी गोलंदाज खेळवायचा विचार करेल असे वाटते. म्हणजेच कुलदीप यादवला संघात जागा दिली गेली तर एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल.

रांची : विजयी आघाडीवर समाधान न मानता मालिकेतील शेवटचा तिसरा सामना जिंकून 3-0 विजय मिळवायचा भारतीय संघाचा निर्धार आहे. रांंचीच्या मैदानावर सराव करून भारतीय संघ तिसर्‍या कसोटी सामन्याला सज्ज झाला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत रांची कसोटी सामन्याची खेळपट्टी फिरकीला जास्त साथ देण्याची शक्यता असल्याने पाहुण्या संघाची अजूनच गाळण उडाली आहे.

भारतात यायचं म्हणून बांगलदेशने कसला संघ जाहीर केलाय बघा

तसेच बघायला गेले तर मालिकेचा निकाल पुणे कसोटी जिंकल्यावरच लागला होता. पण क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला ‘डेड रबर’ म्हणजे निरर्थक सामना म्हणले जाते त्या तिसर्‍या कसोटी सामन्याला आयसीसी टेस्ट चँम्पीयनशीप चालू झाल्याने धार चढली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सुधारीत खेळ करून कसोटी सामना वाचवायला धडपडणार आहे. भारतीय संघाच्या मनात मात्रं हाती असलेली चांगल्या खेळाची लय घट्ट पकडून ठेवून तिसरा कसोटी सामनाही जिंकायची स्वप्न पिंगा घालत आहेत.

Image

रांचीच्या खेळपट्टीचा अंदाज घेता भारतीय संघाचा कप्तान तिसरा फिरकी गोलंदाज खेळवायचा विचार करेल असे वाटते. म्हणजेच कुलदीप यादवला संघात जागा दिली गेली तर एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल. महंमद शमी जबरदस्त मारा करत असल्याने आणि दुसर्‍या कसोटी सामन्यात उमेश यादवने सुंदर मारा केल्याने बाहेर बसण्याची कुर्‍हाड इशांत शर्मावर पडेल असे वाटते.

Image

दक्षिण आफ्रिकेच्या संघात बरेच बदल होण्याची चर्चा आहे. मार्करम आणि केशव महाराजला दुखापत झाल्याने ते दोघे रांची कसोटीत नक्की खेळणार नाहीत. जागा घेणार्‍या खेळाडूंना मोठा अनुभव नसल्याने कप्तान फाफ डु प्लेसीची अवस्था ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. फाफ डु प्लेसीला एकदातरी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची संधी हवी आहे. रांचीच्या खेळपट्टीचा चेहरा बघता चौथ्या डावात फलंदाजी करणे खूपच आव्हानात्मक ठरणार आहे. जर खेळपट्टीने फिरकीला साथ दिली आणि भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरला तर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची चांगलीच सत्त्वपरीक्षा बघितली जाणार आहे.

पाकिस्तानच्या ट्वेंटी20 क्रिकेटची धूरा विराट कोहलीकडे!

एक दिवसीय असो वा टी20, मर्यादित षटकांचा सामना असला की रांचीचे प्रेक्षक मैदान भरून टाकतात. कसोटी सामन्याकरता त्याच्या उलट अवस्था आहे. जेमतेम दोन हजार तिकिटे विकली गेल्याचे कानावर येत आहे. झारखंड क्रिकेट संघटनेने संपूर्ण सामन्याकरता 5हजार तिकिटे गणवेशातील जवानांकरता मोफत देण्याची घोषणा केली आहे. रांची सामन्याचे पहिला दिवस मस्त हवेचे असेल दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघ रांचीला कसोटी सामना खेळणार असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमी सामन्याच्या दिवशी मैदानाचा रस्ता पकडतील अशी आशा संयोजक बाळगून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kuldeep Yadav might get a place in Playing XI for 3rd test against South Africa