आशियाई कुमार हॉकीत भारतीय मुलींना ब्रॉंझपदक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

बॅंकॉक - संगीता कुमारी हिने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय मुलींनी कोरियाचा 3-0 असा पराभव करून 18 वर्षांखालील वयोगटात आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले. 

रितुने 45व्या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांत संगीताने दोन गोल करून भारताचा विजय निश्‍चित केला. संगीताने प्रथम 55 आणि नंतर 58व्या मिनिटाला गोल केला. 

बॅंकॉक - संगीता कुमारी हिने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय मुलींनी कोरियाचा 3-0 असा पराभव करून 18 वर्षांखालील वयोगटात आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले. 

रितुने 45व्या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांत संगीताने दोन गोल करून भारताचा विजय निश्‍चित केला. संगीताने प्रथम 55 आणि नंतर 58व्या मिनिटाला गोल केला. 

सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत गेला होता. भारतीय मुलींनी लांबपल्ल्याचे पास देत चेंडूवर नियंत्रण राखून गोल करण्याच्या काही संधीही निर्माण केल्या होत्या. पण, त्यांना यश आले नाही. कोरियन खेळाडूंनीदेखील चांगले प्रतिआक्रमण केले. त्यांनी अनेक पेनल्टी कॉर्नरदेखील मिळविले. पण, त्यापैकी एकही सार्थकी लागला नाही. भारतीय बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पूर्वार्धात भारताने गोल करण्याची एक सुवर्णसंधी दवडली. त्या वेळी जाळीपासून जवळ असणारी महिमा चेंडू येण्याची वाट बघत असतानाच, संगीताने थेट गोल करण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ गेला. 

उत्तरार्धाच्या सुरवातीला रितुने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना भारताचे खाते उघडले. त्यानंतर काहीच मिनिटांनी लार्लेमसिआमी आणि संगीता यांच्या सुरेख समन्वयाने भारताचा दुसरा गोल झाला. या दोघींना नियमबाह्य पद्धतीने अडवल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. मात्र, मनप्रीत कौरला ती संधी साधता आली नाही. कोरियन गोलरक्षक ली दा बोम हिने तिचा प्रयत्न असफल ठरवला. 

हा प्रयत्न फसल्यानंतरही भारतीयांचे आक्रमण चालू राहिले. पुन्हा एकदा लार्लेमसिआमी हिने संगीताकडे अचूक पास दिला. या वेळी संगीताने कोरियाच्या दोघा बचावपटूंना चकवून भारताचा दुसरा गोल केला. पाठोपाठ याच दोघींची चाल पुन्हा यशस्वी झाली. संगीताने वैयक्तिक दुसरा आणि भारताचा तिसरा गोल केला. अखेरच्या काही मिनिटांत कोरियन खेळाडूंनी एक कॉर्नर मिळविला, तरी भारतीयांनी बचाव अभेद्य ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

हॉकी इंडियाकडून बक्षीस 
भारतीय मुलींच्या या कामगिरीचे हॉकी इंडियाने कौतुक केले आहे. त्यांनी ब्रॉंझपदक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस रोख एक लाख, तर सपोर्ट स्टाफला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले. 

Web Title: Kumar Asian Indian girls hockey bronze