सेनचे चौथ्या जेतेपदांचे "लक्ष्य' साध्य

लक्ष्य सेन
लक्ष्य सेन

मुंबई : लक्ष्य सेनने तीन महिन्यातील चौथे विजेतेपद जिंकताना स्कॉटिश ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बाजी मारली. त्याने जवळपास एक तास चाललेल्या अंतिम लढतीत पहिला गेम गमावल्यावर बाजी मारताना ब्राझीलच्या यागॉर कोएल्हो यास हरवले.

ग्लासगो येथील स्पर्धेत लक्ष्यने 56 मिनिटात 18-21, 21-18, 21-19 असा विजय मिळवला. या विजयामुळे तो जागतिक क्रमवारीत पहिल्या चाळीस खेळाडूंत प्रवेश करेल. त्याने हाच धडाका कायम राखल्यास तो एप्रिलपर्यंत अव्वल 16 मध्येही येऊ शकेल, असे मानले जात आहे. दरम्यान, अव्वल चाळीसमध्ये आल्याने त्याला द्वितीय श्रेणीच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळू शकेल.

स्कॉटिश ओपन जिंकलेला लक्ष्य हा चौथा भारतीय. भारतीयांनी ही स्पर्धा एकंदर पाच वेळा जिंकली आहे. त्यात आनंद पवारने 2010 आणि 2012 मध्ये, अरविंद भट्टने 2004 मध्ये; तर गोपीचंद यांनी 1999 मध्ये बाजी मारली होती. आता नऊ वर्षांनंतर भारतीय विजेता ठरला आहे. लक्ष्यने 15 सप्टेंबरला बेल्जियम ओपन, 13 ऑक्‍टोबरला डच ओपन, तर 3 नोव्हेंबरला सॉरलॉरलक्‍स ओपन जिंकली होती.

आयरीश ओपनमधील दुसऱ्या फेरीतील अपयश मागे सारण्याच्या उद्देशाने लक्ष्य या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने अंतिम फेरीपूर्वीच्या चार लढतीत दोन गेममध्येच बाजी मारली होती. अंतिम फेरीत सातत्याने बदलणाऱ्या आघाडीचा पहिला गेम त्याने गमावला. दुसऱ्या गेममध्ये त्याला 7-0 आघाडीवरून 17-17 बरोबरीस सामोरे जावे लागले, पण त्यानंतर त्याने खेळ उंचावला. निर्णायक गेम त्याने 8-11 पिछाडीनंतर जिंकण्यात यश मिळवले.

जागतिक क्रमवारीत विक्रमी झेप
स्कॉटिश ओपन जिंकल्यामुळे लक्ष्य सेनला जागतिक क्रमवारीत 37 वा क्रमांक मिळण्याची शक्‍यता आहे. हे घडल्यास तो अव्वल चाळीसमध्ये स्थान मिळवणारा सर्वात लहान भारतीय बॅडमिंटनपटू ठरण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com