ललित, रुपिंदरचे हॉकी संघात पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

अनुभवी ड्रॅगफ्लीकर रुपिंदर पाल सिंग तसेच ललित उपाध्यायचे भारतीय हॉकी संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रुपिंदरची प्रथमच निवड झाली आहे. बेल्जियम दौऱ्यासाठी ही निवड झाली आहे. 
 

मुंबई L अनुभवी ड्रॅगफ्लीकर रुपिंदर पाल सिंगचे भारतीय हॉकी संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रुपिंदरची प्रथमच निवड झाली आहे. बेल्जियम दौऱ्यासाठी ही निवड झाली आहे.

भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रता लढतीच्या पूर्वतयारीसाठी बेल्जियममध्ये पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. तो आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर संघाबाहेरच गेला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. मार्गदर्शक ग्रॅहम फोर्ड यांचा हा पहिला दौरा होता, पण त्यानंतर तो संघाबाहेर गेला. आता बेल्जियम दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातील तो सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे.

बेल्जियम जागतिक तसेच युरोपियन विजेते आहेत. त्यामुळे भारताने आपला पूर्ण ताकदवान संघ निवडला आहे. रुपिंदरप्रमाणेच ललित उपाध्याय हाही संघात परतला आहे. तो विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर प्रथमच खेळणार आहे. त्याला आठ महिने पाठदुखीने सतावले होते. ललित तंदुरुस्त झाला असला तरी मध्यरक्षक चिंगलेनसाना अद्याप घोटा दुखापतीतून सावरलेला नाही.

ललित तसेच रुपिंदर संघात आल्याचा नक्कीच फायदा होईल. ललित आक्रमक फळीचा महत्त्वाचा घटक असेल. अर्थात खेळातील काही उणिवा बेल्जियम दौऱ्यापूर्वी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आता या दौऱ्यात आमचे नेदरलॅंडस्‌ संघासोबतही सराव आहे. त्याचा नक्कीच संघास फायदा होईल, असे ग्रॅहम फोर्ड यांनी सांगितले.

बेल्जियमचा त्यांच्या देशात सामना करणे सोपे नाही. या सामन्याचे महत्त्व लक्षात घेऊनच पूर्ण ताकदवान संघ निवडला आहे. स्पेनही आमचा कस पाहील, असे त्यांनी सांगितले. भारत बेल्जियममध्येविरुद्ध तीन, तर स्पेनविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.

भारतीय संघ- गोलरक्षक : पी आर श्रीजेश, कृष्णन बहादूर पाठक. बचावपटू : अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा, गुरिंदर सिंग, हरमनप्रीत सिंग, कोथाजित सिंग, रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार, वरुण कुमार. मध्यरक्षक : मनप्रीत सिंग (कर्णधार), निलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, आक्रमक : आकाशदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, रमणदीप सिंग, सिमरनजीत सिंग, आकाशदीप सिंग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lalit, rupinder selected in indian hockey team