Malinga Retires: मलिंगाचा फ्रंचायजी क्रिकेटला रामराम, मुंबई इंडियन्समधूनही बाहेर

सकाळ ऑनलाइन टीम
Thursday, 21 January 2021

लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत.

नवी दिल्ली- जगातील महान गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने सर्व फ्रंचायजी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. आयपीएल 2021 साठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने मुंबई इंडियन्सला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. मुंबई इंडियन्स व्यवस्थापनानेही मलिंगाच्या निर्णयाचा सन्मान करत बुधवारी जारी झालेल्या 18 सदस्यीय रिटेन स्क्वॉडमध्ये त्याचा समावेश केला नाही. 

मुंबई इंडियन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मलिंगाने त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन निवृत्तीचा विचार केला असल्याचे सांगितले होते. कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर फ्रंचायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ असल्याचे मलिंगाने म्हटले. कोरोनाच्या संसर्गामुळे आणि प्रवासासंबंधीच्या बंधनामुळे पुढील वर्षी फ्रंचायजी क्रिकेटमध्ये येणे माझ्यासाठी कठीण झाले होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे मलिंगाने सांगितले. 

हेही वाचा- IPL 2021 : मुंबई इंडियन्सनं यॉर्कर किंग मलिंगाला केलं रिलीज

मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाशी केली चर्चा
मलिंगाने निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्याचे सांगितले. तब्बल 12 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणे अभिमानास्पद होते. यासाठी मी मुंबई इंडियन्स आणि सर्व पाठीराख्यांचे मी आभार मानतो, असे तो म्हणाला. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट 
लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत. 13 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

हेही वाचा- टीम इंडियाच्या फायटरला ICC नं केलं स्पायडर मॅन!

दरम्यान, मलिंगा आयपीएलशिवाय जगभरातील अनेक फ्रंचायजीकडून खेळलेला आहे. गॉल ग्लॅडियेटर्स, गयाना ऍमेझॉन वॉरियर्स, जमैका तल्लावाह्स, कँडी, केंट, खुल्ना टायटल्स, मराठा अरेबियन्स, मेलबर्न स्टार्स, मॉन्ट्रियल टायगर्स, नॉनडेस्क्रिप्स क्रिकेट क्लब, पॅलेस डायमंड्स, रंगपूर रायडर्स, रुहुना रेड्स, रुहुना रॉयल्स, सदर्न एक्स्प्रेस, सदर्न प्रॉव्हिएन्स आणि सेंट लुसिया जोक्स या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केलेले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lasith Malinga decides to retire from franchise cricket ipl mumbai indians