लियॉन करतोय आश्‍विनचा होमवर्क

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - भारत दौऱ्यासाठी चेंडू वळणाऱ्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचा कसा सामना करायचा याचा होमवर्क प्रतिस्पर्धी संघ करतात. ऑस्ट्रेलियाच्या संघातील एका गोलंदाजाने मात्र एका भारतीय स्पीनरचा होमवर्क सुरू ठेवला आहे. कांगारूंचा प्रमुख फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन हा ऑफस्पीनर भारतासाठी विकेटचे रतीब टाकणाऱ्या आर. आश्‍विनच्या गोलंदाजीचे फुटेज पाहण्यात व्यग्र आहे. लियॉनने स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कसोटी क्रिकेटमध्ये २५० विकेटची वेगवान कामगिरी करताना आश्‍विनने ऑस्ट्रेलियाच्याच डेनिस लिली यांचा विक्रम नुकताच मोडला. ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार स्टीव वॉ याने आश्‍विनची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी तुलना केली. साहजिकच आश्‍विनचे नाव गाजते आहे. ऑस्ट्रेलियाला श्रीलंका दौऱ्यात सपाटून मार खावा लागला. त्यात लियॉनचे अपयश कारणीभूत ठरले होते. साहजिकच उपखंडात प्रभावी ठरण्यासाठी लियॉन कसून तयारी करीत आहे. त्याने सांगितले की, अर्थातच आश्‍विन हा जगातील अव्वल गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचा होमवर्क करण्यासाठी हे योग्यच कारण आहे. तो अशा परिस्थितीत बराच खेळला आहे. त्यामुळे तो कशी गोलंदाजी करतो याचे फुटेज हे मी खूप वेळा बारकाईने पाहात आहे. त्यातून काही गोष्टींचा अवलंब करण्याचा प्रयत्न आहे.

लियॉनसह कांगारूंनी एकूण पाच फिरकी गोलंदाज दौऱ्यावर आणले आहेत. कदाचित नवा चेंडू लियॉनकडे सोपविला जाण्याचीही शक्‍यता आहे. त्याने सांगितले की, ‘‘हा निर्णय कर्णधारावर अवलंबून असेल, पण मी तयारी करीत आहे असे म्हणायला हरकत नाही. नवा चेंडू कडक असेल, तो स्कीड होईल, वळेल, उसळेल सुद्धा किंवा तसे होणारही नाही. मला याचा अंदाज नसेल तर विराट कोहली यालासुद्धा तो आताच येणार नाही. खेळ सुरू झाल्यानंतरच ते स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल.’’

श्रीलंकेतील अपयश
गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंका दौरा केला. तीन कसोटींत लियॉनने १६ विकेट घेतल्या, पण त्याची सरासरी ३१.९३, इकॉनॉमी रेट ३.३१, तर स्ट्राईक रेट ५७.७ असा फारसा प्रभावी नव्हता. अखेरच्या कसोटीतील अखेरच्या डावात १२३ धावांत चार विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी अपुरीच ठरली. कांगारूंनी ही मालिका ०-३ अशी गमावली. या अपयशातून सावरण्याचे आव्हान लियॉनवर आहे.

Web Title: Leon doing homework