
Lionel Messi : लिओनेल मेस्सीचा ८०० वा गोल! पनामावर विश्वविजेत्या अर्जेंटिनाचा दमदार विजय
ब्यूनस एअर्स (अर्जेंटिना) : गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केल्यानंतर विश्वविजेता बनलेल्या अर्जेंटिनाने त्यानंतर खेळलेल्या पहिल्याच सामन्यात जगज्जेतेपदाच्या थाटात खेळ केला. महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीतील ८०० वा गोल या लढतीचे वैशिष्ट्य ठरला.
अर्जेंटिनाने पनामा देशावर २-० असा विजय मिळवला. दोन देशांमधील हा मैत्रीपूर्ण सामना होता. आता अर्जेंटिनाचा पुढील सामना कुरकाओ या देशाशी संटीयागो डेल एस्तेरो येथे होणार आहे.
अर्जेंटिना पनामा यांच्यामधील लढत अर्जेंटिना, ब्यूनस एअर्स येथील मोनूमेंटल स्टेडियममध्ये खेळवण्यात आली. अर्जेंटिनाने जगज्जेतेपद मिळवल्यानंतरची ही पहिलीच लढत होती. त्यामुळे फुटबॉलप्रेमींची या लढतीची तिकिटे मिळवण्यासाठी झुंबड उडाली. १.५ मिलियन क्रीडाप्रेमींनी या लढतीची तिकिटे मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ८३ हजार नशीबवान मेस्सी चाहत्यांनाच तिकिटे मिळवता आली हे विशेष.
अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी अर्जेंटिनाच्या संघात बदल केला नाही. फ्रान्सविरुद्धच्या लढतीत विजयी होणारा अर्जेंटिनाचा संघ कायम ठेवण्यात आला. अर्जेंटिनाने सुरुवातीपासून विश्वविजेतेपदाच्या थाटातच खेळ केला. त्यांच्याकडे फुटबॉलचा तावा हा ७३ टक्के होता.
उत्तरार्धात विजयी गोल
अर्जेंटिना पनामा या संघांना पूर्वार्थात एकही गोल करता आला नाही. अर्जेंटिनाने उत्तरार्धात विजयासाठी अधिक प्रयत्न केले. लिओनेल मेस्सी त्यांच्यासाठी धावून आला. ७८ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला फ्री किक मिळाली.
मेस्सीने यावर गोल करण्याचा प्रयत्न केला, पण फुटबॉल क्रॉसबारला लागला. पण त्यानंतर थिआगो अल्माडा याने गोल करीत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ८९ व्या मिनिटाला पुन्हा एकदा अर्जेंटिनाला फ्री किक मिळाली. मेस्सीने या वेळी गोल करण्यात यश मिळवले. हा त्याचा ८०० वा गोल ठरला. तसेच या सामन्यातील त्याची ही पाचवी फ्री किक होती.