Lionel Messi : मेस्सीकडून पीएसजी क्लब आणि पाठीराख्यांची माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

Lionel Messi : मेस्सीकडून पीएसजी क्लब आणि पाठीराख्यांची माफी

पॅरिस - सहकारी आणि क्लबला न सांगताच सौदी अरेबियाच्या ट्रिपवर गेल्यामुळे निलंबित झालेल्या लिओनेल मेस्सीने या घटनेवरून क्लबचे सदस्य आणि पीएसजी पाठीराख्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. मला माझ्या संघसहकाऱ्यांची आणि क्लबची माफी मागायची आहे, अशी व्हिडीओ क्लिप मेस्सीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

गेल्या आठवड्यात सामना झाल्यानंतर एका दिवसाची सुट्टी मिळणार आहे असा माझा समज होता, मी सौदी अरेबियाची सहल आयोजित केली होती, जी मी अगोदर रद्द केली होती. या वेळी मी ती रद्द करू शकलो नाही.

मात्र मी जे काही केले त्याबद्दल मला माफी मागायची आहे, असेही मेस्सीने म्हटले आहे. लीग-१ मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात पीएसजीचा लॉरियन्सविरुद्ध १-३ असा पराभव झाला होता. त्यानंतर मेस्सी लगेचच सौदी अरेबियात गेला. मात्र त्याची परवानगी त्याने घेतली नव्हती. त्यामुळे पीएसजी क्लबने त्याला निलंबित केले आणि या काळातले मानधनही कापण्याचा निर्णय घेतला.