
Lionel Messi Suspended : बायकोसोबत फिरायला जाणं पडलं महागात! मेस्सी झाला सस्पेंड
Lionel Messi Suspended : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि विश्वविजेता कर्णधार लिओनेल मेस्सीला निलंबित करण्यात आले आहे. क्लब पॅरिस सेंट-जर्मेनने (PSG) अर्जेंटिनाच्या स्टारला दोन आठवड्यांसाठी निलंबित केले आहे. बायकोसोबत फिरायला जाणं त्याला महागात पडलं आहे.
विनापरवानगी तो पत्नी आणि मुलांसोबत सौदी अरेबियाला फिरायला गेला होता. त्यामुळे क्लबने त्याला 2 आठवड्यांसाठी निलंबित केले आहे. लिओनेल मेस्सी गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेला होता.
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'लिओनेल मेस्सीवर अनेक दिवसांची बंदी घालण्यात येणार आहे. तर फ्रान्समधील अनेक माध्यम संस्था त्यांच्यावर 2 आठवड्यांसाठी बंदी घालणार असल्याचे सांगत आहेत. सूत्रानुसार, या काळात मेस्सी सराव करू शकत नाही, तो खेळू शकत नाही आणि त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्याला पैसे दिले जाणार नाहीत.
2022 साली अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकून देण्यात लिओनेल मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. लिओनेल मेस्सी पुढील महिन्यात 36 वर्षांचा होणार आहे. अलीकडेच रविवारी तो पॅरिस सेंट-जर्मेनसाठी लीग 1 मध्ये लॉरिएंट विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात लॉरिएंटने पॅरिस सेंट-जर्मेनचा 3-1 असा पराभव केला.
संघाच्या नियमांनुसार, पीएसजीने तो सामना जिंकला असता तर खेळाडूंना दोन दिवस सुट्टी मिळाली असती, परंतु पीएसजीने हा सामना गमावला. या प्रकरणात सुट्टी रद्द करण्यात आली. नियमांनुसार या परिस्थितीत मेस्सीने संघासोबत प्रशिक्षण घ्यायला हवे होते, मात्र तो सौदी अरेबियाला गेला.