लीग कप माघारीचा लिव्हरपूलचा इशारा

गोलचा आनंद साजरा करताना ख्रिस्तियानो रोनाल्डो
गोलचा आनंद साजरा करताना ख्रिस्तियानो रोनाल्डो

लंडन : व्यावसायिक फुटबॉलच्या भरगच्च कार्यक्रमामुळे संघांवरील तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. लीग कपचा अंतिम टप्पा आणि विश्‍वकरंडक क्‍लब स्पर्धा यात फारसे अंतर नसल्यामुळे लीग कपवरील बहिष्काराच इशारा लिव्हरपूलने दिला आहे.

लीग कपच्या उपांत्यपूर्व लढती 16 डिसेंबरपासून सुरू होतील. त्याचवेळी लिव्हरपूल विश्‍वकरंडक क्‍लब स्पर्धा कतारमध्ये असेल. विश्‍वकरंडक क्‍लब स्पर्धा कतारमध्ये डिसेंबरमध्ये असेल असे फिफाने सांगितले आहे. आता लीग स्पर्धा कार्यक्रमात बदल न झाल्यास आम्ही या स्पर्धेत खेळणार नाही, असे लिव्हरपूलचे मार्गदर्शक जर्गन क्‍लॉप यांनी सांगितले.

लीग कप कार्यक्रमात बदल अवघड असेल. दूरचित्रवाणी प्रक्षेपणामुळे हे जास्त अवघड असते; पण लिव्हरपूलने मांडलेला प्रश्‍न गंभीर आहे. आता या स्पर्धेतून माघारीचा लिव्हरपूलने निर्णय अमलात आणल्यास त्यांच्यावरील कारवाईही अवघड असेल, असे सांगितले जात आहे.

लिव्हरपूलची शूटआऊटवर सरशी
लंडन ः लिव्हरपूलने लीग कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना आर्सेनलला पेनल्टी शूटआऊटवर 5-4 असे हरवले. त्यापूर्वी प्रतिस्पर्ध्यांतील लढत 5-5 बरोबरीत सुटली होती. प्रतिस्पर्ध्यांनी संघात अकरा बदल केले होते. त्यामुळे प्रामुख्याने नवोदितांचाच संघ होता, पण त्यांनी चमकदार खेळाची मेजवानी दिली. अखेर 20 वर्षीय आयरीश गोलरक्षक काओईम्हीन केल्लेहेर याने दानी सेबालोस याची रोखलेली किक निर्णायक ठरली. दरम्यान, मॅंचेस्टर युनायटेडने चेल्सीचा 2-1 असा पाडाव केला.

रोनाल्डोमुळे युव्हेंटिसची आघाडी
रोम ः ख्रिस्तियानो रोनाल्डोने 96 व्या मिनिटास पेनल्टी सत्कारणी लावली, त्यामुळे युव्हेंटिसने जिनीओचा 2-1 असा पाडाव केला आणि सिरी ए अर्थात इटलीतील फुटबॉल साखळीत अव्वल क्रमांक मिळवला. यापूर्वीची युव्हेंटिसची लढत बरोबरीत सुटली होती, रोनाल्डोच्या पुनरागमनानंतरही हीच स्थिती दिसत होती. भरपाई वेळेत त्याचा गोल वारने नाकारला, पण रोनाल्डोने पेनल्टी सत्कारणी लावली. दरम्यान, अटलांटाने दोनदा पिछाडी भरून काढत नापोलीस 2-2 रोखले.

रेयालचा सफाईदार विजय
बार्सिलोना ः रेयाल माद्रिदने झिनेदिन झिदान याच्या पुनरागमनानंतरचा सर्वात मोठा विजय मिळवताना ला लिगा अर्थात स्पॅनिश साखळीत लेगान्सला 5-0 हरवले. रेयालच्या सर्वच आक्रमकांनी बहारदार कामगिरी करीत विजय सोपा केला, त्यामुळे गेरार्थ बेलची उणीव भासली नाही. या विजयानंतरही रेयाल माद्रिद बार्सिलोनामागोमाग आहे. मात्र, दोघांतील फरक एकाच गुणाचा आहे. रेयालने ऍटलेटीकोस मागे टाकले आहे.

बोरुसिया डॉर्टमंडची आगेकूच
बर्लिन ः बोरुसिया डॉर्टमंडने बोरुसिया मोएनशेनग्लॅडबॅशचा 2-1 पाडाव करीत जर्मन कप स्पर्धेत आगेकूच केली. दरम्यान, आरबी लीपझिगने वोल्वस्‌बर्गला 6-1 पराजित केले. या सामन्यात विजेत्यांनी तेरा मिनिटात चार गोल केले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com