सचिनच्या समितीचीही ‘लोढां’कडून विकेट?

पीटीआय
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई/नवी दिल्ली - लोढा समितीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा समावेश असलेली क्रिकेट समितीच रद्द करण्याचे ठरवले आहे. या समितीने अनिल कुंबळे यांची मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती; पण आता मार्गदर्शकांपासून सपोर्ट स्टाफच्या निवडीपर्यंतचे अधिकार संघनिवड करणाऱ्या समितीसच असतील, असे सूत्रांनी सांगितले.

लोढा समितीने सुचवल्यानंतर प्रशासकांची समिती १९ जानेवारीपासून भारतीय मंडळाची सूत्रे आपल्या हाती घेणार आहे. मात्र, ही समिती क्रिकेटसंदर्भातील निर्णय निवड समितीच्या शिफारशीनुसारच घेणार आहे. लोढा समितीने निवड समितीचे नामकरणच क्रिकेट समिती, असे केले आहे. समितीच्या शिफारशीनुसार ही समिती भारतीय संघाची निवड करेल; तसेच ते मार्गदर्शकांसह सपोर्ट स्टाफची निवड करतील आणि संघाच्या कामगिरीचा तीन महिन्यांचा अहवालही प्रशासकीय समितीस सादर करतील. एकंदरीत त्यामुळे अर्थातच गांगुली, तेंडुलकर व लक्ष्मणचा समावेश असलेली क्रिकेट समिती आता गुंडाळली जाणार हे स्पष्ट आहे. 

कुमार निवड समितीचे कुमार क्रिकेट समिती, असे बारसे होईल. या समितीकडे स्पर्धांचे संयोजन, तसेच दौऱ्यांची जबाबदारी असेल. त्याचबरोबर या गटाच्या स्पर्धेत वाद झाल्यास त्याबाबतचा निर्णयही समितीच घेईल. महिला क्रिकेट समितीचेही काम याच स्वरूपाचे असेल.

Web Title: lodha Committee