लोढा समितीच्या काही शिफारशी अमान्यच - अनुराग ठाकूर

लोढा समितीच्या काही शिफारशी अमान्यच - अनुराग ठाकूर

बेळगाव - न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारीशींपेक्षा बीसीसीआयने आपल्या कारभारात जास्त सुधारणा केल्या आहेत, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केला आहे. शिवाय "लोढा समितीच्या काही शिफारशी आम्हाला मान्य नाहीत, त्या पुढेही मान्य करणार नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले. सामने सुरू असताना दोन षटकांदरम्यानच्या जाहिराती बंद करता येणार नाहीत, असे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे.

केएलई संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त बेळगाव भेटीवर आलेल्या श्री. ठाकूर यांनी "सकाळ'शी संवाद साधताना आयसीसीशी काही मतभेद नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'एक राज्य एक मत, सामने सुरू असताना दोन षटकांच्या मध्ये प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध, खर्चावर मर्यादा अशा शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने सुचवल्या आहेत, पण त्यापैकी काही शिफारसी व्यावसायिकदृष्ट्या न परवडणाऱ्या आहेत. बीसीसीआयकडे निधी नसेल तर खेळाची प्रगती कशी होणार? त्यामुळे साऱ्या शिफारशी जशाच्या तशा लागू करता येणार नाहीत. म्हणून बीसीसीआयच्या अनेक सदस्यांचा विरोध आहे.''

लोढा समितीच्या शिफारसी बीसीसीआय मान्य करीत नसल्याने बीसीसीआयच्या आर्थिक नाड्या आवळत लोढा समितीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड संघावर खर्च करण्यास आधी निर्बंध लादले होते. नंतर सुमारे 58 लाख रुपये प्रति सामना असा खर्च करण्याची मुभा देऊन खर्चाचा तपशील मागितला आहे, मात्र या निर्णयाचा इंग्लडविरुद्धच्या मालिकेवर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे श्री. ठाकुर यांनी सांगितले.

"स्पिन-फ्रेंडली' खेळपट्ट्यांबाबत छेडले असता श्री. ठाकूर म्हणाले, 'भारतीय क्रिकेट संघ नेहमीच दर्जेदार खेळावर भर देत आला आहे. त्यामुळेच विदेशातही भारतीय संघाने अनेक विक्रम केले आहेत. त्यांची आणखी कामगिरी उंचाविण्यासाठी सर्वांचे पाठबळ हवे. देशातील खेळपट्ट्यांनी भारताच्या बाजूने निकाल दिले आहेत, हे मान्य असले तरी इतर देशांमध्येही आपण कमी पडलेलो नाही. स्पर्धा म्हटले की होम ऍडव्हांटेज आलेच.'
सामन्यांचे आयोजन, महसूल विभागणी आणि डीआरएस (पंचाच्या निर्णयाला आव्हान) याबाबात आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) का मतभेद आहेत, असे विचारता श्री. ठाकूर म्हणाले, "आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये हेवेदावे नाहीत. जिथे आम्हाला आमचा हक्क डावलला जातोय असे असे वाटते, तिथेच आम्ही आमचा आक्षेप नोंदवितो. डीआरएस आयसीसीच्या साऱ्या स्पर्धांमध्ये असते. आम्ही ती आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्वीकारली आहेच.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com