"महा'चक्रीवादळचा राजकोट सामन्याला फटका बसणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

नवी दिल्लीतील प्रदूषणाच्या विळख्यात पहिला ट्‌वेन्टी-20 सामना व्यवस्थित पार पडला असला तरी भारत-बांगलादेश मालिकेतील सामन्यावरचे सावट संपलेले नाही. मालिकेतला दुसरा सामना राजकोटला होत आहे; परंतु "महा'चक्रीवादळ गुजरातला धडकणार असल्यामुळे जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

राजकोट : नवी दिल्लीतील प्रदूषणाच्या विळख्यात पहिला ट्‌वेन्टी-20 सामना व्यवस्थित पार पडला असला तरी भारत-बांगलादेश मालिकेतील सामन्यावरचे सावट संपलेले नाही. मालिकेतला दुसरा सामना राजकोटला होत आहे; परंतु "महा'चक्रीवादळ गुजरातला धडकणार असल्यामुळे जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी गुरुवारी होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट असेल.

अरबी समुद्रात तयार झालेले "महा'चक्रीवादळ 6 आणि 7 तारखेला गुजरातला धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे आणि 7 तारखेलाच राजकोट येथे मालिकेतला दुसरा सामना होणार आहे. त्यातल्या त्यात दिलासा देणारे वृत्त म्हणजे या वादळाची तीव्रता 5 तारखेपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे आणि त्यापुढे ते आणखी कमी होईल असे सांगितले जात आहे.

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार हे वादळ बुधवारी रात्री गुजरातवरून पुढे जाणार आहे आणि राजकोट हे गुजरातच्या मध्यावर आहे. तसेच हे शहर गुजरात बंदरापासून 100 किलोमीटर दूर आहे. द्वारका आणि दीव भागालाही बुधवारी रात्री या वादळाचा फटका बसू शकेल आणि त्याचा वेग ताशी 120 कि.मी. असण्याची शक्‍यता आहे.

एकूणच या वादळाचा परिणाम जोरदार वारे आणि पाऊस पडण्यावर होऊ शकेल आणि त्याचा फटका गुरुवारी होणाऱ्या सामन्याला बसू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील प्रदूषित हवामानामुळे पहिला सामना रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात होती. बांगलादेशचे खेळाडू मास्क लावून सराव करत होते. परंतु, सामन्यात त्यांच्या एकाही खेळाडूने मास्क न लावता खेळ केला आणि कसलीही तक्रार केली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maha cyclone may affect Rajkot T20