'खेलो इंडिया'त महाराष्ट्राची गैरहजेरी

आदित्य वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017


नेल्लोर आणि गुंटूर येथे 18 ते 23 जानेवारीदरम्यान "खेलो इंडिया'च्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाकडून शून्य प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या "खेलो इंडिया' स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकही संघ गेला नसल्याचे समोर आले आहे. अनुदानाच्या पत्रव्यवहारात संघनिवडीसाठी घ्यावयाच्या तालुका पातळीपासूनच्या स्पर्धा आयोजितच करण्यात आल्या नसल्यामुळे ही नामुष्की आल्याची चर्चा आहे.
नेल्लोर आणि गुंटूर येथे 18 ते 23 जानेवारीदरम्यान "खेलो इंडिया'च्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाकडून शून्य प्रतिसाद मिळाला. वुशू, खो-खो आणि कबड्डीच्या या राष्ट्रीय स्पर्धांसाठी विविध राज्यांतील संघांनी हजेरी लावली आहे. महाराष्ट्राचे या खेळात वर्चस्व असतानाही त्यांचाच संघ नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात क्रीडा आयुक्त राजाराम माने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण उत्तर प्रदेश येथे असल्याचे सांगितले. सहसंचालक नरेंद्र सोपल यांचा संपर्क होऊ शकला नाही, तर सहायक संचालक सुधीर मोरे यांनी परिपत्रकात त्रुटी असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि खेळाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायका स्पर्धांचे "खेलो इंडिया, खेलो' असे बारसे करण्यात आले. यात पूर्वी ग्रामपंचायतीतर्फे संघ पाठवला जायचा. "खेलो इंडिया'त मात्र शाळांच्याही प्रवेशिका स्वीकारल्या जात असल्याने स्पर्धांमध्ये गर्दी वाढत आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळासह तालुका पातळीवरील स्पर्धा खेळवणे शक्‍य नसल्याचा सूर क्रीडा विभागातून निघाला होता. याशिवाय या स्पर्धांसाठी मिळणारे अनुदानही तोकडे असल्याने ते वाढवून देण्याची मागणी क्रीडा विभागाने केंद्राकडे केली होती. यावर केंद्राकडून राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्याचा संघ पाठवण्याचे फर्मान आले. अशा परिस्थितीत खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची निवडच करण्यात आली नाही. पत्र व्यवहाराच्या कात्रीतच सगळे अडकून पडले. पर्यायाने संघच रवाना होऊ शकले नाहीत.

परिपत्रकातच त्रुटी : मोरे
पहिल्या परिपत्रकात असलेल्या त्रुटी सुधारून आल्या खऱ्या; पण झालेले बदल केंद्रातर्फे खूप उशिरा कळवण्यात आले. त्यामुळे जिल्हा, राज्य स्पर्धा खेळवण्यासाठी वेळच मिळाला नाही. शिवाय जिल्हा स्तर स्पर्धांसाठी केवळ दहा हजार रुपये देण्यात आले. अशा परिस्थितीत मुलांना प्रवास आणि आहार भत्ता कोठून द्यायचा हा सवालच होता. नव्याने आलेल्या केंद्राकडील पत्रात 14, 17 असा वयोगट कुस्तीसाठी नमूद करण्यात आला होता; मात्र आयोजकांनी 14 ते 16 असा वयोगट नमूद केल्याने अधिक संभ्रम निर्माण झाला असल्याचे सहायक संचालक सुधीर मोरे यांनी सांगितले.

Web Title: maharashtra absent in khelo india