महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

रुद्रपूर (उत्तराखंड) - महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघाने किशोर गटाच्या २०व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सोलापूरचा अजय कश्‍यप ‘भरत’, तर उस्मानाबादची अमृता जगतारप ‘ईला’ पुरस्काराची मानकरी ठरली.

रुद्रपूर (उत्तराखंड) - महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघाने किशोर गटाच्या २०व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सोलापूरचा अजय कश्‍यप ‘भरत’, तर उस्मानाबादची अमृता जगतारप ‘ईला’ पुरस्काराची मानकरी ठरली.

किशोर गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राला तेलंगणाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. महाराष्ट्राने पहिल्या डावातील दोन गुणांची पिछाडी भरून काढत नियोजित वेळेत ११-११ अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर अतिरिक्त डावात संघर्षपूर्ण खेळात तेलंगणाचा १७-१६ असा एका गुणाने पराभव केला. तेलंगणाने प्रथम संरक्षण स्वीकारल्यावर महाराष्ट्राच्या आक्रमकांना हुलकावण्या देत भक्कम बचाव केला. महाराष्ट्राला त्यांचे पाचच गडी टिपता आले. तेलंगणाने आक्रमणातही एक पाऊल पुढे ठेवत महाराष्ट्राचे सात गडी टिपत विश्रांतीला दोन गुणांची आघाडी घेतली. 

उत्तरार्धात महाराष्ट्राने खेळ उंचावत तेलंगणाला आव्हान देत आक्रमण आणि संरक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत सामना ११-११ असा बरोबरीत आणला. अलाहिदा डावात पुन्हा एकदा बरोबरीसाठी तेलंगणाला एका गुणाची अवश्‍यकता असताना अजय कश्‍यपने १.४० मिनिटे बचाव करत त्यांच्या विजेतेपद मिळविण्याच्या आशांना सुरुंग लावला आणि महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून अजय कश्‍यपसह विवेक ब्राह्मणे, सचिन पवार, रवी वसावे, किरण वसावे यांचा खेळ सर्वोत्तम  ठरला. 

महाराष्ट्राच्या मुलींनी मात्र वर्चस्वाची एकही संधी सोडली नाही. त्यांनी ओडिशाचे आव्हान (७-२, ०-४) ७-६ असा एक डाव आणि एका गुणाने पराभव केला. महाराष्ट्राच्या अमृता जगताप (३ मिनिटे नाबाद), मनीषा पडेर (२.३० मिनिटे) यांचा बचाव आणि ललिता गोबाले (३ गडी), अर्चना व्हनमाने (३ गडी) यांचे आक्रमण निर्णायक ठरले.

Web Title: Maharashtra double title kho-kho competition