esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : किताबासाठी लढणार एकाच तालमीतले दोन पैलवान!
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra-Kesari-2020-Final

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र केसरी 2020 : किताबासाठी लढणार एकाच तालमीतले दोन पैलवान!

sakal_logo
By
मतीन शेख

महाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाची अंतिम लढत शुक्रवारी (ता.6) मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली. शुक्रवारचे निकाल धक्कादायक लागत गेले. गादी आणि  माती अशा दोन्ही विभागातून काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके उद्या महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम लढत अतीतटीची व चित्तथरारत ठरली. सोलापुरचा ज्ञानेश्वर जमदाडे विरुद्ध लातुरचा शैलेश शेळके यांच्यातली लढत शेवटच्या अवघ्या ७ सेकंदत ‘काटे की टक्कर’ देत ज्ञानेश्वरवर शैलेशने ११-१० गुणसंख्येने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत स्थान निश्चित केले.  

अभिजीतचे डबल महाराष्ट्र केसरी किताबाचे स्वप्न दुभंगले

नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने २०१७ चा महाराष्ट्र केसरी विजेता पुणे शहराचा अभिजीत काटकेला ५-२ गुणांनी पराजित केले. त्यामुळे ही आजच्या दिवसातील विशेष लक्षवेधी आणि धक्कादायक निकाल असणारी लढत ठरली. डाव प्रतिडावात रंगलेल्या लढली हर्षवर्धने अभिजीत वर कब्जा मिळवत विजय संपादन केला. 

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काका पवार म्हणाले, “दोन्हीही माझ्याच तालमीत तयार झाले आहेत. दोघेही ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विजेते आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी किताबासाठी दोघेही प्रथमच मैदानात उतरले आहेत. ते तगडे पहिलवान आहेत याचा मला विश्वास होता. म्हणूनच दोघांनाही वेगवेगळ्या विभागातून मैदानात उतरविले. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले.

- महाराष्ट्र केसरी 2020 : पुण्याचा 'हॉट फेव्हरेट' अभिजीत कटके स्पर्धेबाहेर!

दोघेही माझेच पठ्ठे असल्याने घरात गुण्यागोविंदाने राहायचे. मात्र, मैदानात प्रतिस्पर्धी म्हणूनच राहायचं हे संगितले आहे. विजयी कोणीही झाला तरी मला आनंदच असणार आहे. गेली कित्येक वर्ष आमच्या तालमीचे पहिलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते. मात्र विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र महाराष्ट्र केसरी आमचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”

शैलेशला जिंकण्याचा आत्मविश्वास

शैलेश शेळके म्हणाला, “मी गेले अनेक वर्षे काकांच्या तालमीत तयार झालो आहे. आर्थिक परिस्थितीमुळे लष्करात भारती झालो. पण कुस्ती मात्र कधीही सोडली नाही. उद्याच्या कुस्तीसाठी मानसिक तयारीच महत्वाची आहे. उद्या मी डोक्याने खेळ करणार आहे. किताबच्या शर्यतीत पोहचेन याचा आत्मविश्वास मला होता.”

हर्षवर्धनची मॅटवरची तयारी

हर्षवर्धन म्हणाला, “उद्याची कुस्ती गादीवर असून मी गेले सहा महिने गादीच्या कुस्तीचा सराव करत आहे. आम्ही दोघे एकमेकाचा खेळ जाणतो. त्यामुळे उद्या जो जास्त चांगली कुस्ती खेळेल तोच विजयी होईल.”

- #AustralianBushfire : शेन वॉर्न करतोय टोपीचा लिलाव; आगीतील पीडितांसाठी खेळाडू सरसावले!

उपांत्य फेर्‍यांमधील थरार

महाराष्ट्र केसरी खुला गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरसीची लढत झाली. अपेक्षेप्रमाणे बाला रफिकने आक्रमक पवित्रा घेतला; परंतु माऊलीने एका मिनिटाच्या आत हाप्ती डावावर त्याला चितपट करून बाजी मारली व माती विभागातील अंतिम सामन्यात प्रवेश केला.

तसेच लातूरच्या शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगतापवर ६-४ गुण फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पुणे शहराचा अभिजीत कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी चित्त थरारक तुल्यबळ लढत झाली. यात अभिजीतने सागरवर २-० गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नाशिक जिल्हयाच्या हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवार ६-० ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

- Happy Birthday Kapil Dev : रणवीरने कपिल पाजींना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

अंतिम लढतीवेळी शरद पवार राहणार उपस्थित

उद्या महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.