VIDEO : कसा होता महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा तिसरा दिवस?

Maharashtra kesari day 3
Maharashtra kesari day 3 sakal

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

सातारा, ता. ७ : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये आज गतविजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, पुणे शहरचा हर्षद कोकाटे, बीडचा अक्षय शिंदे, तर कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांनी गादी विभागात उपांत्य फेरीत प्रवेश केला. माती विभागात माऊली उर्फ ज्ञानेश्वर माऊली जमदाडे, वाशिमचा सिकंदर शेख, सोलापूरचा महेंद्र गायकवाड व मुंबई पूर्वचा विशाल बनकरने बाजी मारली.

दरम्यान, तिसऱ्या फेरीतच बुलढाण्याचा बाला रफिक शेख, साताऱ्याचा दिग्विजय जाधव, हिंगोलीचा गणेश जगताप, कोल्हापूरचा कौतुक डाफळे यांचे आव्हान संपुष्टात आले.

Maharashtra kesari day 3
'तुम्ही अजून काही पाहिलेलं नाही' पराभवानंतर रोहितची भावूक पोस्ट

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. महाराष्ट्र केसरीच्या चौथ्या फेरीत गादी विभागात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विरूद्ध कोल्हापूरचा संग्राम पाटील एकमेकांना भिडले. संग्रामने दोन मिनिटांत बचावात्मक पवित्रा घेत हर्षवर्धनला एकही गुण घेऊ दिला नाही. त्याने हर्षवर्धनवर एकेरी एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो फोल ठरवून हर्षवर्धनने दोन गुण वसूल केले. तीन मिनिटांत २-० असा गुण फरक राहिला. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने एक गुण मिळवला. अनुभवाचा पुरेपूर वापर करत अखेर हर्षवर्धनने बाजी मारली.

ठाण्याचा अक्षय मदने विरूद्ध पुणे शहरचा हर्षद कोकाटे यांच्यातील लढत सुरू होताच अक्षयने एक गुण मिळवला. त्यानंतर हर्षदने भारंदाज डाव टाकून अक्षयला जोरदार प्रत्युत्तर दिले. सहा मिनिटांत त्याने अक्षयचे डाव परतवून लावले. दोन्ही फेऱ्यांत हर्षदने संयमी लढत दिली. त्याने ही लढत जिंकून प्रेक्षकांची मने जिंकली.

औरंगाबादचा मेघनाथ शिंदे विरूद्ध बीडचा अक्षय शिंदे यांच्यातील लढत प्रेक्षणीय झाली. केवळ एका मिनिटांत तिचा निकाल लागला. अक्षयने लढत सुरू होताच मेघनाथवर पकड मजबूत केली. त्याने त्याला चितपट केले.

Maharashtra kesari day 3
DC vs LSG: डेव्हिड वॉर्नर तर बिश्नोईची 'आवडती' शिकार

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध अहमदनगरचा सुदर्शन कोतकर यांच्यातील लढतीकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. पृथ्वीराजने एकेरी पट काढत एक गुण मिळवला. त्याने भारंदाज टाकण्याचा केलेला प्रयत्न सुदर्शनने परतवला. पुन्हा खडाखडी सुरू झाली. पहिल्या फेरीत पृथ्वीराजने ५, तर सुदर्शनने २ गुण मिळवले. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराजने एकेरी पट काढून एक गुण खात्यावर जमा केला. सुदर्शनने चार गुणांची कमाई केल्यानंतर पृथ्वीराज आक्रमक झाला. त्याने दहा गुण मिळवून लढत जिंकली.

माती विभागात नांदेडचा अनिल जाधव विरूद्ध अमरावती ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यातील लढत आठ वाजून ४९ मिनिटांस सुरवात झाली. ज्ञानेश्वरने दस्ती काढण्याचा केलेला प्रयत्न अनिलने धुडकावला. एकेरी पट काढून त्याने तीन गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत एकेरी पट काढून भारंदाज डाव टाकला. त्यानंतर पुन्हा एकेरी पट काढला. त्याने दहा गुणांची कमाई करत विजय मिळवला.

Maharashtra kesari day 3
IPL 2022 : आता मुंबई इंडियन्स देखील 'कमिन्स मार्गा'वर चालणार

वाशिमचा सिकंदर शेख विरूद्ध गोंदियाचा वेताळ शेळके यांच्यात लढत झाली. दोन्ही पैलवानांनी एकमेकांचा अंदाज घेत डाव टाकण्यास सुरवात केली. या फेरीत सिकंदरने एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीत सिकंदरने एकेरी पट काढून भारंदाज डावावर गुणांची कमाई केली. त्यानंतर वेताळच्या पाठीवर जाऊन त्याने भारंदाज डावावर तब्बल एकूण दहा गुण मिळवले. लढतीत त्याने वेताळला पराभूत करत आव्हान जिवंत ठेवले.

सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरूद्ध मुंबई पश्चिमचा भारत मदने यांच्या लढतीत महेंद्रने दोन गुण वसुल केले. पुन्हा पुट्टी मारुन भारतला खाली खेचले. पुन्हा त्याच्यावर ताबा मिळवला. सहा गुण मिळवून तो पुन्हा आक्रमक झाला. त्याने भारतला लपेट डावावर चितपट करुन प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

मुंबई पूर्वचा विशाल बनकर विरूद्ध बीडचा सूरज मुंडे यांच्यातील लढतीत विशालने सूरजला काही सेकंदातच चितपट केले. साल्टो मारण्याचा प्रयत्न सूरजच्या अंगलट आला.

दरम्यान, माती विभागात तिसऱ्या फेरीत कोल्हापूरचा कौतुक डाफळेचे आव्हान संपुष्टात आले. त्याला नांदेडच्या अनिल जाधवने चितपट केले. बुलढाण्याचा बाला रफिक शेख याला मुंबई पूर्वच्या विशाल बनकरने पराभूत केले. बालाने सुरवातीला आक्रमक लढत दिली. त्याने तीन गुण मिळवले. त्यानंतर मात्र विशालने सावध पवित्रा घेत लढत केली. त्याने दुहेरी पट व भारंदाजवर बालाचा आत्मविश्वास कमी केला. त्याने ही लढत १३ विरूद्ध ३ गुण फरकाने जिंकली.

गादी विभागात हिंगोलीचा गणेश जगताप विरुद्ध पुणे शहरचा हर्षद कोकाटे यांच्यात लढत झाली. या लढतीत हर्षद विशालवर भारी पडला. हर्षदने गणेशला ७ विरूद्ध ६ गुण फरकाने पराभूत केले. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध साताऱ्याचा दिग्विजय जाधव निष्प्रभ ठरला. पृथ्वीराजने दीड मिनिटांत सहा गुण मिळवले. पुढे त्याने दहा गुण मिळवून दिग्विजयचे आव्हान संपुष्टात आणले.

Maharashtra kesari day 3
IPL 2022 : आता मुंबई इंडियन्स देखील 'कमिन्स मार्गा'वर चालणार

तत्पूर्वी झालेल्या ६१ किलो गटाच्या गादी विभागात कोल्हापूरचा विजय पाटील विरुद्ध सोलापूरचा तुषार देसाई यांच्यातील लढत रंगतदार झाली. विजयने ही लढत ८ विरुद्ध ७ गुण फरकाने जिंकली. ८६ किलो गादी विभागात नाशिकचा बाळू बोडके विरुद्ध अहमदनगरचा हृषीकेश लांडे यांच्यात झाली. ती तांत्रिक गुणांवर बाळूने विजय मिळवला. याच गटात कोल्हापूर किरण पाटील विरूद्ध विशाल राजगे यांच्यात लढत झाली. त्यात किरणने कास्यपदक पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com